उपराजधानीत वस्तीत तीन तासांपासून धुमाकूळ घालत होता गुन्हेगार; पोलिसांनी तात्काळ कारवाई केली नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 14:05 IST2021-02-09T04:11:03+5:302021-02-09T14:05:55+5:30
नागपूर : नागरिकांच्या मारहाणीमुळे जीव गमावलेला शांतीनगर ठाण्याच्या परिसरातील गुन्हेगार विजय ऊर्फ विजू वागधरे तीन तासांपासून वस्तीत धुमाकूळ घालत ...

उपराजधानीत वस्तीत तीन तासांपासून धुमाकूळ घालत होता गुन्हेगार; पोलिसांनी तात्काळ कारवाई केली नाही
नागपूर : नागरिकांच्या मारहाणीमुळे जीव गमावलेला शांतीनगर ठाण्याच्या परिसरातील गुन्हेगार विजय ऊर्फ विजू वागधरे तीन तासांपासून वस्तीत धुमाकूळ घालत होता. ही बाब माहीत असतानाही शांतीनगर पोलिसांनी तात्काळ कारवाई केली नाही. उलट विजूची तक्रार घेऊन गेलेल्या नागरिकांना नेते आल्याचे सांगून सोमवारी येण्याचा सल्ला दिला. पोलिसांनी आरोपी सुनील हारोडे, सागर करारे, बंटी ऊर्फ यश हारोडे आणि सुमित ढेरे यांना अटक केली आहे.
रविवारी रात्री २४ वर्षीय विजय ऊर्फ विजू वामन वाघधरेचा खून करण्यात आला. विजयच्या खुनानंतर परिसरात दहशत पसरली आहे. नागरिक स्थानिक पोलिसांच्या दुर्लक्षामुळे ही घटना घडल्याचे सांगत आहेत. यामुळे शांतीनगर पोलीस आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी चुप्पी साधली आहे. विजय अनेक दिवसांपासून परिसरात गुन्हेगारी कारवाया करीत होता. परिसरातील नागरिकांनुसार तो आपल्या साथीदारांच्या मदतीने हप्तावसुली करीत होता. तो शस्त्राच्या धाकावर महिला आणि युवकांना धमकी देत होता. तो लोधीपुरा येथे राहत होता. त्याचे नेहमीच नारायणपेठमधील युवकांशी भांडण होत होते. त्याची नारायणपेठमधील एका गुन्हेगार असलेल्या युवकाशी मैत्री होती. या युवकाला खुनाच्या प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा झाली आहे. तो कोरोनामुळे पॅरोलवर आला आहे. या युवकाचे विजयच्या खुनातील आरोपी सागर करारे, सुनील हारोडे यांच्याशी वैमनस्य आहे. पॅरोलवर आल्यानंतर विजयही नारायणपेठमधील युवकांशी भांडण करण्याचा बहाणा शोधत होता.
१५ दिवसांपूर्वी माझ्याकडे का पाहिले या कारणावरून त्याने ऋतिक नावाच्या युवकाला मारहाण केली. तो रविवारी दुपारी ४.४५ वाजता ऋतिकचा खून करण्याच्या उद्देशाने नारायणपेठमध्ये आला. बाहेरगावी असल्यामुळे ऋतिक त्याच्या हाती लागला नाही. ऋतिकची कॉलेजचे विद्यार्थी उदय घुबडे, आरोपी सुनील हारोडेचा चुलतभाऊ संजयशी मैत्री आहे. विजयने दोघांवर हल्ला केला. संजय पळून गेला. परंतु उदय जखमी झाला. त्याने किराणा दुकानात लपून आपला जीव वाचविला. त्यानंतर दोघे वस्तीतील महिलांसोबत विजयची तक्रार देण्यासाठी शांतीनगर ठाण्यात पोहोचले. पोलिसांनी नेत्यांचा बंदोबस्त असल्याचे सांगून विजयचा शोध घेतला नाही. त्यांनी उदयला वैद्यकीय तपासणीसाठी मेडिकलमध्ये पाठविले. दरम्यान, शांतीनगर पोलीस आणि वरिष्ठ अधिकारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बंदोबस्तात व्यस्त झाले.
विजय साथीदारांसोबत बाईकने आरोपी ठाण्यातून येण्याची वाट पाहत होता. रात्री ७.३० वाजता विजय चाकू घेऊन नारायणपेठमध्ये पोहोचला. सुनील हारोडेच्या घरासमोर धुमाकूळ घालून त्याचा खून करण्याची धमकी देऊ लागला. विजयची दहशत असल्यामुळे आरोपींनी त्यास जिवंत सोडणे चुकीचे असल्याचा निर्धार केला. त्यांनी शस्त्र, विटा, दगड, काठ्यांनी मारहाण करून त्याचा खुन केला. नारायणपेठमधील नागरिकांच्या मते शांतीनगर ठाण्याच्या परिसरात गुन्हेगारी वाढली आहे. गुन्हेगारांची हिंमत एवढी वाढली आहे की ते आपले होर्डिंग लावून पोलिसांना आव्हान देतात. कुख्यात तिरुपतीने जागोजागी आपले होर्डिंग लावले आहेत. तिरुपती विरुद्ध मकोकाची कारवाई करण्यात आली आहे. शांतीनगर ठाण्याच्या हद्दीत अनेक कुख्यात आरोपी असून ते नेता म्हणून फिरतात. पोलिसांच्या मदतीने ते अवैध धंदे चालवित असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
पोलीस आयुक्तांनी फटकारले
घटनेला पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी गंभीरतेने घेतले आहे. ते आज सकाळी वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत शांतीनगर ठाण्यात पोहोचले. त्यांनी अधिकारी, कर्मचाऱ्यांची खरडपट्टी काढली. विजयने हल्ला केल्यानंतर तत्परता न दाखविल्याबद्दल त्यांनी अधिकाऱ्यांना फटकारले. पोलीस आयुक्तांच्या मते पोलिसांनी कारवाई केली असती तर खुनाची घटना घडली नसती. विजय अनेक दिवसांपासून परिसरात धुमाकूळ घालत होता. शांतीनगर परिसरात गुन्हेगारांची संख्या अधिक आहे. अशी घटना घडल्यामुळे पोलीसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह लागले आहे.
बदला घेण्यासाठी सांगितली नावे
विजयच्या खुनानंतर पॅरोलवर आलेला त्याचा मित्र पोलिसांची दिशाभूल करीत आहे. सूत्रांनुसार वस्तीतील नागरिकांच्या बयाणावरून त्यास जन्मठेपेची शिक्षा झाली आहे. त्यामुळे तो वस्तीतील नागरिकांना धडा शिकविण्याचा प्रयत्न करीत आहे. ज्यांचा खुनाशी संबंध नाही अशा नागरिकांची नावे तो सांगत आहे. त्याने १० ते १२ जणांची नावे सांगितली आहेत. सुरुवातीला पोलिसांनी त्याच्यावर विश्वास ठेवला. परंतु त्याची चतुराई समोर आल्यामुळे पोलीस तपासात लागले आहेत. पोलिसांनी चौघांना अटक केली आहे.
............