सत्ताबदलाच्या पार्श्वभूमीवर उपराजधानीत सतर्कतेचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2019 11:13 AM2019-11-27T11:13:01+5:302019-11-27T11:13:52+5:30

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पदाचा राजीनामा देताच पोलीस महासंचालनालयाने पुन्हा एकदा राज्यभरातील पोलिसांना अतिसतर्कतेचा इशारा दिला.

Vigilance order in the Nagpur in current situation | सत्ताबदलाच्या पार्श्वभूमीवर उपराजधानीत सतर्कतेचे आदेश

सत्ताबदलाच्या पार्श्वभूमीवर उपराजधानीत सतर्कतेचे आदेश

Next
ठळक मुद्देपोलिसांच्या सुट्या रद्द

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पदाचा राजीनामा देताच पोलीस महासंचालनालयाने पुन्हा एकदा राज्यभरातील पोलिसांना अतिसतर्कतेचा इशारा दिला. या पार्श्वभूमीवर आजपासून पुन्हा एकदा पोलिसांच्या सुट्या अनिर्णीत कालावधीसाठी रद्द करण्यात आल्या असून, सर्वत्र चोख बंदोबस्त लावण्यात आला आहे.
दोन दिवसांपूर्वी पद आणि गोपनीयतेची शपथ घेतलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी पदाचा राजीनामा दिल्याने, पुन्हा एकदा राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला. सत्तांतरानंतर नवे सरकार येण्याची तयारी सुरू झाल्याने कुठे काही कुरबुरी, वाद होण्याची शक्यता ध्यानात घेऊन, पोलीस महासंचालनालयाने दुपारी १२ वाजता राज्य पोलीस दलाला अतिसतर्कतेचे आदेश दिले. ऐनवेळी धावपळ होऊ नये म्हणून सर्व तयारी करून ठेवण्याच्याही सूचना करण्यात आल्या. या पार्श्वभूमीवर, मनुष्यबळाच्या कमतरतेमुळे ऐनवेळी गोंधळ उडू नये म्हणून पुढच्या आदेशापर्यंत पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांना रजा देण्यात येऊ नये, जे रजेवर गेलेले आहेत, त्यांना बोलवून घ्यावे, असे सूचनावजा आदेश देण्यात आले आहेत.
नागपूर हे देशाचे हृदयस्थळ आहे. संघ मुख्यालय, दीक्षाभूमी या अतिमहत्त्वाच्या स्थळांमुळे तसेच माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे गृहनगर म्हणूनही नागपूर शहराची सर्वत्र ओळख आहे. येथे काही अनुचित घटना घडल्यास त्याचे सर्वत्र पडसाद उमटू शकते. त्यामुळे नागपुरात चोख बंदोबस्त ठेवण्याचे आदेश आहेत. या पार्श्वभूमीवर, शहर आणि जिल्हा पोलिसांनी खबरदारीच्या उपाययोजना केल्या आहेत.

अफवांवर विश्वास ठेवू नका
पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी सर्व पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांना सतर्क राहण्याचे निर्देश दिले आहे. आम्ही सज्जच आहोत. मात्र, नागपुरातील नागरिकही सतर्क आणि शांतताप्रिय आहे. त्यामुळे येथे कसलाही अनुचित प्रकार घडणार नाही, असा विश्वास मंगळवारी दुपारी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला. त्यांनी नागरिकांना आवाहन करताना कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असेही म्हटले आहे.

Web Title: Vigilance order in the Nagpur in current situation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Policeपोलिस