लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आठवडाभरापासून सुरू असलेले अवकाळी पावसाचे सत्र पुढचे तीन चार दिवस कायम राहणार आहे. यात १४ व १५ तारखेला वेगवान वादळ व विजांच्या कडकडाटासह जाेरदार पाऊस येण्याचीही शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. भंडारा, गाेंदिया, गडचिराेली, वर्धा व यवतमाळ या पाच जिल्ह्यात अवकाळी पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
उत्तरेकडून पश्चिमेकडे वाहणाऱ्या उष्ण वाऱ्याची दिशा बदलल्याने विदर्भात अवकाळी पावसासाठी पाेषक वातावरण तयार झाले आहे. विदर्भात गेल्या सहा दिवसात काही जिल्ह्यात विजेच्या कडकडासह तुरळक आणि सामान्य पावसाची नोंद झालेली आहे. पुढील दोन दिवस विदर्भात आकाशात ढग दाटलेली असतील. मात्र, बुधवारी आणि गुरुवारी विदर्भातील काही जिल्हात जाेरदार पावसाची दाट शक्यता असल्यामुळं हवामान विभागाकडून पाच जिल्ह्यांसाठी ‘ऑरेंज अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. इतरही जिल्ह्यात वादळी व पावसाळी वातावरण राहील, अशीच शक्यता आहे.
तापमानात माेठी घसरणमे महिन्यात नागपूर आणि विदर्भात उचांक्की तापमानाची नोंद हाेते. यावर्षी पहिले १५ दिवस चटक्याविनाच असतील. साेमवारी कमाल तापमानात माेठी घसरण झाली. रविवारी ३९.६ अंशावर असलेला नागपूरचा पारा ३.२ अंशाने घसरला व ३५.९ अंश तापमानाची नाेंद करण्यात आली, जी सरासरीपेक्षा तब्बल ७.१ अंशाने खाली आहे. बुलढाण्यात सर्वात कमी ३४.५ अंशाची नाेंद झाली. याशिवाय वर्धा ३६.५ अंश, भंडारा ३७.४ अंश, गाेंदिया ३७.८ अंश, वाशिम ३७.६, चंद्रपूर ३९.६, यवतमाळ ३९ अंश या जिल्ह्यातही तापमानात घट नाेंदविण्यात आली आहे. गडचिराेलीत तापमान वाढून ४०.६ अंशावर गेले आहे.
पुढचे १५ दिवसही अवकाळीचा गारवा?दरम्यान हवामान विभागाने जारी केलेल्या नव्या अंदाजानुसार विदर्भासह संपूर्ण महाराष्ट्रात यापुढे १५ ते २० दिवस म्हणजे संपूर्ण मे महिना अवकाळी पावसाच्या सावटाखाली जाण्याची शक्यता आहे. २३ ते ३१ मे पर्यंत मान्सून कधीही केरळात दाखल हाेण्याची शक्यता आहे. अंदमान व आग्नेय बंगालच्या उपसागरात दाखल झालेला मान्सून चांगलाच कोसळत असुन त्याच्या पुढील वाटचालीस अनुकूल वातावरण तयार होत आहे. त्यामुळे महाराष्ट्रातही मान्सूनपूर्व अवकाळी पावसाची दाट शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पेरणीपूर्वीच्या मशागतीला वेग येण्याची शक्यता आहे.