विदर्भाला हुडहुडी, नागपूर सर्वाधिक थंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2019 07:56 PM2019-12-28T19:56:51+5:302019-12-28T19:59:17+5:30

उत्तर भारतातून येणाऱ्या थंड हवेमुळे विदर्भ थंडीने गारठला आहे. शनिवारी नागपूरचे किमान तापमान ५.१ अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले. पारा रेकॉर्ड ७.५ डिग्रीने खाली उतरल्याने नागपूर हे विदर्भात सर्वात थंड राहिले.

Vidarbha shivering , Nagpur most cold | विदर्भाला हुडहुडी, नागपूर सर्वाधिक थंड

विदर्भाला हुडहुडी, नागपूर सर्वाधिक थंड

googlenewsNext
ठळक मुद्देनागपूर ५.१ अंश, गोंदिया ५.२ व चंद्रपूर ५.४ अंशावर

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : उत्तर भारतातून येणाऱ्या थंड हवेमुळे विदर्भ थंडीने गारठला आहे. शनिवारी नागपूरचे किमान तापमान ५.१ अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले. पारा रेकॉर्ड ७.५ डिग्रीने खाली उतरल्याने नागपूर हे विदर्भात सर्वात थंड राहिले. विदर्भातील प्रत्येक जिल्ह्यात पारा ५ ते ८ अंश सेल्सिअसने खाली घसरल्याने संपूर्ण विदर्भालाच हुडहुडी भरली आहे.
उत्तर भारतात होत असलेली बर्फवृष्टी व हवेची दिशा उत्तरेकडून दक्षिणेकडे असल्याने मध्य भारतात कडाक्याची थंडी आहे. विदर्भात गडचिरोली १२ व वाशिम ११.२ अंश सेल्सिअस वगळले तर सर्व जिल्ह्यातील तापमान दहा अंशापेक्षा खाली राहिले. मिळालेल्या माहितीनुसार, नागपूरनंतर गोंदिया थंडीच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर राहिले. येथे किमान तापमान ५.२ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले. चंद्रपूर तिसऱ्या क्रमांकावर राहिले. चंद्रपूरमध्ये ५.४ अंश सेल्सिअस इतके तापमान नोंदविण्यात आले. विदर्भातील इतर ठिकाणचे तापमान असे राहिले. ब्रह्मपुरी ६.९ अंश सेल्सिअस, वर्धा ७.५ अंश सेल्सिअस, अकोला ८.७ अंश सेल्सिअस, यवतमाळ ९, अमरावती ९.२, बुलडाणा ९.५ इतके नोंदविण्यात आले.
हवामान विभागानुसार डिसेंबरमधील राहिलेले दिवसही अशीच थंडी कायम राहील. ३१ डिसेंबरपासून पावसाची शक्यताही हवामान विभागाने वर्तविली आहे.
शेजारी राज्यातही कडाक्याची थंडी
शेजारी राज्य मध्यप्रदेश व छत्तीसगडमध्येसुद्धा कडाक्याची थंडी आहे. पचमढी १.२ अंश सेल्सिअससह पूर्ण मध्यभारतात सर्वाधिक थंड राहिले. यासोबतच टीकमगढ १.५, उमरिया १.९ आणि बैतुल येथील २.८ अंश सेल्सिअस इतके किमान तापमान नोंदवण्यात आले. याशिवाय मध्य प्रदेश आणि छत्तीसगड राज्यातील बहुतांश जिल्ह्यात तापमान ५ अंश सेल्सिअसच्या खाली राहिले.
रबी पिकांना संजीवनी
थंडीअभावी हरभरा पिकांचीही वाढ खुंटल्याने खरिपातून नुकताच सावरलेला शेतकरी चिंतित होता. रबी हंगामदेखील हातून जातो की काय, अशी भीती व्यक्त होत होती. परंतु उशिराने जाणवू लागलेल्या थंडीचा रबी पिकांना मात्र, फायदा होणार असून ही थंडी संजीवनी देणारी ठरणार आहे.

Web Title: Vidarbha shivering , Nagpur most cold

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.