Nagpur Rain Update : काही दिवसाच्या उघाडानंतर विदर्भावर पुन्हा पावसाचे सावट पसरले आहे. गुरुवारी नागपुरात सकाळच्या उकाड्यानंतर दिवसभर सरीवर सरी बरसत राहिल्या. याशिवाय वर्धा, अमरावती, गाेंदिया, चंद्रपूर व गडचिराेली जिल्ह्यात चांगला पाऊस झाला. हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढचे दाेन दिवस विदर्भाच्या बहुतेक जिल्ह्यात विजा व गडगडाटीसह मुसळधार पाऊस हाेण्याची शक्यता आहे.
वेधशाळेच्या निरीक्षणानुसार दक्षिण ओरिसा व उत्तर आंध्र प्रदेश किनारपट्टी दरम्यान ३.१ किमी. उंचीपर्यंत चक्रीय वाऱ्याची स्थिती तयार झाली आहे. मान्सून आसाचे पश्चिम टोक दक्षिणेकडे गुजरातपर्यंत सरकल्यामुळे त्याच्या परिणामातून अरबी समुद्र व बंगालच्या उपसागरातून आर्द्रता खेचली जात असल्याने मान्सूनी वारे सक्रिय झाले आहेत. त्यामुळे विदर्भातील सर्व ११ जिल्ह्यांसह मध्य महाराष्ट्रातही पावसाळी स्थिती निर्माण झाली आहे. त्यानुसार येत्या १५ सप्टेंबरपर्यंत विदर्भात मध्यम ते जाेरदार पावसाचा अंदाज आहे.
नागपुरात बुधवारी दुपार व रात्रीच्या सरीनंतर ढग शांत झाले हाेते. गुरुवारी सकाळी सूर्यदर्शनही घडले व उकाडा जाणवायला लागला हाेता. त्यानंतर सकाळी ११.३० वाजता वातावरण बदलले व जाेरात पाऊस बरसला. अर्धा तासात पावसाने उसंत घेतली व ढगांचे सावट कायम हाेते. दुपारी २ वाजताच्या दरम्यान पुन्हा मध्यम तीव्रतेने पाऊस सुरू झाला व ४ वाजतापर्यंत ही रिपरिप कायम राहिली. सायंकाळी ५.३० पर्यंत शहरात ११ मि.मी. पावसाची नाेंद झाली. सकाळी ७८ टक्क्यावर असलेली आर्द्रता सायंकाळी ९५ टक्क्यावर पाेहचली. त्यामुळे तापमानात २.३ अंशाची घट हाेत ३२.२ अंश नाेंद झाली.
वर्ध्यात गुरुवारी दिवसा २० मि.मी., अमरावतीत २७ मि.मी. आणि गाेंदियात १९ मि.मी. पावसाची नाेंद झाली आहे. चंद्रपूरला सकाळपर्यंत ३५ मि.मी. व दिवसा ५ मि.मी. पाऊस झाली. गडचिराेलीतही ३०.४ मि.मी. पाऊस नाेंदविला गेला. यवतमाळला सकाळपर्यंत १८.८ मि.मी. पाऊस बरसला व दिवसा ढग शांत राहिले.
पूर्ण सप्टेंबर महिना पावसाळी?
वेधशाळेच्या अंदाजानुसार पुढचे दाेन दिवस विदर्भात मुसळधार पाऊस हाेण्याची शक्यता आहे. हवामान तज्ज्ञांच्या मते, यंदा संपूर्ण सप्टेंबर महिन्यात पावसासाठी अनुकूल प्रणाली सक्रिय राहणार आहेत. अंदाजानुसार विदर्भात १३ ते १८, व पुढे २५ सप्टेंबरपर्यंत पावसाची स्थिती राहणार आहे. त्यानंतर २७, २८ व २९ सप्टेंबरलाही पावसाचे सावट राहण्याची शक्यता आहे. या महिन्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस हाेण्याचीही शक्यता आहे.