राज ठाकरे १८ पासून विदर्भात; सेनेची जागा घेण्याचे मनसेचे मनसुबे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2022 22:02 IST2022-09-13T22:01:48+5:302022-09-13T22:02:38+5:30
Nagpur News मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे १८ सप्टेंबर रोजी पाच दिवसांच्या विदर्भ दौऱ्यावर येत असून त्यांनी पहिल्या टप्प्यात नागपूर, चंद्रपूर व अमरावती या तीन महापालिकांवर फोकस केला आहे.

राज ठाकरे १८ पासून विदर्भात; सेनेची जागा घेण्याचे मनसेचे मनसुबे
नागपूर : शिवसेनेत पडलेल्या खिंडारीचा विदर्भात फायदा घेण्यासाठी मनसेने हालचाली सुरू केल्या आहेत. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे १८ सप्टेंबर रोजी पाच दिवसांच्या विदर्भ दौऱ्यावर येत असून त्यांनी पहिल्या टप्प्यात नागपूर, चंद्रपूर व अमरावती या तीन महापालिकांवर फोकस केला आहे.
राज ठाकरे यांनी आजवर नागपूर किंवा विदर्भावर विशेष फोकस केला नव्हता. राज ठाकरे यांनी २०१४ मध्ये पश्चिम नागपुरात जाहीर सभा घेतली होती. त्यानंतर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत ते नागपूर मार्गे वणी येथे प्रचारासाठी गेले होते. हे दोन प्रसंग वगळता त्यांनी नागपुरात संघटनात्मक आढावा बैठक घेतलेली नाही. १८ सप्टेंबर रोजी सकाळी नागपुरात आगमन झाल्यावर ते कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेऊन चर्चा करणार आहेत. रात्री इतर पक्षातील काही प्रमुख नेत्यांच्या भेटीगाठीही होणार आहेत.
१९ रोजी दुपारी ४ वाजता ते चंद्रपूरसाठी रवाना होतील. चंद्रपूरची बैठक आटोपून २० रोजी दुपारी ४ वाजता ते अमरावतीला रवाना होतील. अमरावतीला २१ रोजी संघटनात्मक आढावा घेतील व २२ सप्टेंबर रोजी सायंकाळी रेल्वेने मुंबईला रवाना होतील. राज ठाकरे यांच्या या दौऱ्यासाठी तीनही शहरात नियोजन केले जात असून या दौऱ्याचा पक्षासाठी निश्चितच फायदा होईल, असा दावा प्रदेश सरचिटणीस हेमंत गडकरी यांनी लोकमतशी बोलताना केला.