नागपुरात ट्रकचालकाने घेतला एकाचा बळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2018 01:28 IST2018-04-22T01:28:41+5:302018-04-22T01:28:51+5:30
अपघातामुळे जमाव संतप्त झाला असताना कळमना पोलीस मात्र अपघाताच्या दीड तासानंतर तेथे पोहचले. तोपर्यंत जमावाने रस्ता रोको आंदोलन करून आणि टायर जाळून आपला रोष व्यक्त केला.

नागपुरात ट्रकचालकाने घेतला एकाचा बळी
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अपघातामुळे जमाव संतप्त झाला असताना कळमना पोलीस मात्र अपघाताच्या दीड तासानंतर तेथे पोहचले. तोपर्यंत जमावाने रस्ता रोको आंदोलन करून आणि टायर जाळून आपला रोष व्यक्त केला.
शनिवारी रात्री ९.३० च्या सुमारास पारडी नाक्याजवळच्या कापसी खुर्द जवळ एका ट्रकचालकाने एका व्यक्तीला जोरदार धडक मारली. या अपघातात ती व्यक्ती ठार झाली. त्यामुळे जमाव संतप्त झाला. अपघात झाल्याची आणि ट्रकचालक पळून गेल्याची माहिती जमावातील काहींनी कळमना पोलिसांना कळवली. मात्र, पोलीस तब्बल दीड तास विलंबाने पोहचले. तोपर्यंत मृत व्यक्ती तशीच रस्त्यावर पडून होती. पोलिसांच्या या हलगर्जीपणामुळे जमाव संतप्त झाला त्यांनी तेथे टायर जाळून आणि वाहतूक अडवून आपला संताप व्यक्त केला. जोरदार नारेबाजीही केली. प्रचंड तणाव निर्माण झाला असताना कळमना पोलीस तेथे पोहचले. त्यांनी जमावाची कशीबशी समजूत काढून मृतदेह तेथून रुग्णालयात हलविला. आरोपी ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
या भागात प्रचंड वाहतूक असते. मात्र, पोलिसांचे नियंत्रण नसल्याने तिकडे नेहमीच छोटेमोठे अपघात घडतात. कळमना पोलीस अशाच प्रकारे नेहमी हलगर्जीपणा दाखवतात. हे नेहमीचेच झाल्याने जमावाच्या भावना आज रात्री तीव्र झाल्या होत्या.
अपघातात वृद्धाचा करुण अंत
लग्नाच्या पत्रिका वाटत असताना एका दुचाकीचालकाने जोरदार धडक मारल्याने अब्दुल रहिम खान (वय ६३, रा. ताजनगर टेका) यांचा करुण अंत झाला. १५ एप्रिलला सकाळी १०.३० च्या सुमारास हा अपघात घडला होता.