नागपूर : पाच अल्पवयीन मुलांच्या साथीने वाहनचोरीचे रॅकेट चालविणाऱ्या एका तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. दक्षिण पश्चिम नागपुरातील पॉश भागातून हे आरोपी दुचाकी चोरायचे. चौकशीतून आठ गुन्हे उघडकीस आले आहे. गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक दोनच्या पथकाने ही कारवाई केली.
११ मार्च रोजी रात्री अनिल भावे (५४, शास्त्री ले आऊट, प्रतापनगर) यांची दुचाकी अपार्टमेंटच्या पार्किंगमधून चोरी गेली. त्यांच्या तक्रारीवरून प्रतापनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला होता. गुन्हे शाखेचे पथक याचा समांतर तपास करत होते. खबऱ्यांच्या नेटवर्कच्या माध्यमातून यात प्रवीण रामरतन शर्मा (१९) याचा सहभाग असल्याची बाब समोर आली. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन विचारणा केली असता त्याने चोरी केल्याची कबुली केली. त्याने पाच अल्पवयीन साथीदारांसोबत चोरी केली होती. पोलिसांनी सखोल चौकशी केली असता आरोपींनी एकूण आठ दुचाकी चोरल्याचे सांगितले. प्रतापनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून पाच, एमआयडीसीतून एक तर बजाजनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरलेल्या दोन दुचाकींचा यात समावेश होता. त्यांच्या ताब्यातून सहा मोटारसायकल व चार मोबाईल फोन जप्त करण्यात आले. आरोपींना प्रतापनगर पोलीस ठाण्याच्या हवाली करण्यात आले आहे. पोलीस निरीक्षक गजानन तामटे, गजानन चांभारे, प्रवीण शेळके, कमलेश गणेर, गजानन कुबडे, महेंद्र सडमाके, संदीप चंगोले, सुरेश तेलेवार, मंगल जाधव यांच्या पथकाने ही कारवाई केली.