भाज्या महागच
By Admin | Updated: July 21, 2014 00:53 IST2014-07-21T00:53:33+5:302014-07-21T00:53:33+5:30
मान्सून वेळेत न आल्याचा फटका भाज्यांना बसला. दीड महिन्यांपासून भाज्या महागच आहेत. भाज्यांना पर्याय म्हणून गृहिणींनी कडधान्याचा आधार घेतला आहे. आणखी एक महिनाभर

भाज्या महागच
मिरची ५०, कोथिंबीर १०० : पावसामुळे फटका
नागपूर : मान्सून वेळेत न आल्याचा फटका भाज्यांना बसला. दीड महिन्यांपासून भाज्या महागच आहेत. भाज्यांना पर्याय म्हणून गृहिणींनी कडधान्याचा आधार घेतला आहे. आणखी एक महिनाभर भाज्या जास्त दरातच खरेदी कराव्या लागतील, असे संकेत विक्रेत्यांनी दिले आहेत.
बाजारात उपलब्ध भाज्यांच्या तुलनेत पौष्टिक कडधान्याचे दर कमी आहेत. प्रत्येकाला कॉटन मार्केट आणि कळमना ठोक बाजारात भाजी खरेदीला जाणे शक्य नाही. बहुतांश खरेदी किरकोळ विक्रेत्यांकडून दारातच केली जाते. भाव जास्त असतात. त्यामुळे गृहिणींचे महिन्याचे बजेट बिघडले आहे. त्यांनी कडधान्याचा आधार घेतल्याने काहीसा दिलासा मिळाला आहे.
आवक कमी
गेल्या आठवड्यात मुसळधार पावसाचा वाहतुकीला फटका बसला. त्यामुळे आवक कमी झाली आहे. रविवारी किरकोळ बाजारात मिरची ५० तर कोथिंबीर १०० रुपये किलो होती. कोथिंबीर कितीही महाग असली तरीही प्रत्येकजण थोडीफार खरेदी करतोच. त्यामुळे इतर भाज्यांसोबत कोथिंबीर विक्रीला ठेवावी लागते, अशी प्रतिक्रिया किरकोळ विक्रेत्यांनी दिली. रविवारी कॉटन मार्केटमध्ये जवळपास १५० छोट्यामोठ्या गाड्यांची आवक होती. वांग्याला कीड लागल्याने ठोक बाजारातच २ रुपये किलो विक्री सुरू आहे. स्थानिकांसह बाहेरगावातून आवक मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे ठोक बाजारात पत्ताकोबी १० रुपये, फुलकोबी १५, तोंडले ८ ते १० आणि कोहळे ६ रुपये किलो दर होते. फुलकोबी कोल्हापूर, टमाटर नारायणगाव, इंदूर, हवेली, पत्ताकोबी बेळगाव व मूलताई, कोथिंबीर लातूर व नांदेड, गवार हैदराबाद, हिरवी मिरची हावेरी (कर्नाटक), सिमला मिरची सांगली व नाशिक, कारले भंडारा व मंडला (मध्य प्रदेश) येथून येत आहेत. सध्या भाज्यांना मागणी कमी झाल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.
कांद-बटाटे ३० रुपयांवर स्थिर
केंद्र सरकारच्या निर्बंधानंतर गेल्या दोन आठवड्यांपासून कांदे आणि बटाट्याचे भाव किरकोळमध्ये ३० रुपयांवर स्थिर आहेत. कळमना ठोक बाजारात लाल कांदे १७ ते २१ रुपये किलो असून आवक दररोज १० ते १२ ट्रक आणि पांढरे कांदे १७ ते १९ रुपये किलो तर आवक १० ते १२ ट्रक आहे. भाज्याच्या किमती वाढताच बटाट्याला मागणी वाढली. किरकोळमध्ये भाव दर्जानुसार २५ ते ३० रुपये किलो आहेत. रविवारी कळमन्यात भाव प्रति किलो १८ ते १९ रुपये होते. (प्रतिनिधी)