वासनकरला आज न्यायालयात हजर करणार
By Admin | Updated: August 6, 2014 01:15 IST2014-08-06T01:15:35+5:302014-08-06T01:15:35+5:30
आकर्षक व्याजाचे आमिष दाखवून शेकडो गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांनी फसवणूक करणारा वासनकर वेल्थ मॅनेजमेंटचा प्रबंध संचालक प्रशांत जयदेव वासनकर याच्यासह दोन

वासनकरला आज न्यायालयात हजर करणार
नागपूर : आकर्षक व्याजाचे आमिष दाखवून शेकडो गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांनी फसवणूक करणारा वासनकर वेल्थ मॅनेजमेंटचा प्रबंध संचालक प्रशांत जयदेव वासनकर याच्यासह दोन जणांची पोलीस कोठडी रिमांडची मुदत संपत असल्याने त्यांना बुधवारी एमपीआयडी कायद्याच्या विशेष न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. गुन्हे शाखेचा आर्थिक विभाग या प्रकरणाचा तपास करीत असून उद्या ते प्रशांत वासनकर आणि अभिजित जयंत चौधरी यांना न्यायालयात हजर करून त्यांच्या वाढीव पोलीस कोठडीची मागणी करण्याची शक्यता आहे.
पोलिसांनी २७ जुलै रोजी प्रशांत वासनकर, त्याचा भाऊ विनय वासनकर आणि आणखी एक संचालक अभिजित चौधरी यांना अटक केली होती. न्यायालयाने आधी या तिघांना २ आॅगस्टपर्यंत पोलीस कोठडी रिमांड दिला होता. त्यानंतर पुन्हा प्रशांत आणि अभिजितच्या पोलीस कोठडी रिमांडमध्ये ६ आॅगस्टपर्यंत तर विनयच्या पोलीस कोठडी रिमांडमध्ये ४ आॅगस्टपर्यंत वाढ करण्यात आली होती. विनयच्या पोलीस कोठडी रिमांडची मुदत संपल्यानंतर तपास अधिकाऱ्याने त्याला न्यायालयात हजर करून पुन्हा सात दिवसांच्या पोलीस कोठडी रिमांडची मागणी केली होती.
न्यायालयाने मात्र ही मागणी नामंजूर केली होती. न्यायालयाने विनयला १८ आॅगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावून त्याची कारागृहाकडे रवानगी केली होती. (प्रतिनिधी)