लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूर महापालिकेच्या निवडणुकीत बॅलेट पेपरवर मतदान घेऊन ५१ टक्के मते घेऊनच दाखवा, असे प्रति आव्हान देत काँग्रेसचे गटनेते आ. विजय वडेट्टीवार यांनी महसूल मंत्री व पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आव्हान स्वीकारले.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मत चोरीचा आरोप केल्यानंतर महसूल मंत्री बावनकुळे यांनी टीका केली होती. महापालिकेच्या आगामी नागपूर निवडणुकीतही भाजप ५१ टक्के मते घेऊन विजयी होईल, असा दावा करीत त्यांनी काँग्रेसला आव्हान दिले होते. वडेट्टीवार यांनी हे आव्हान स्वीकारले. ते म्हणाले, चोरी तर चोरी वरून शिरजोरी असा भाजपचा प्रकार सुरू आहे. तुमच्यात जर हिम्मत असेल तर एकदा सर्व निवडणुका बॅलेट पेपरवर घेऊन दाखवा. दूध का दूध पाणी का पाणी होऊ द्या. एकीकडे व्हीव्हीपॅटच गायब करण्याचा निर्णय घेतला जातो. यावरूनच तुमची भूमिका प्रामाणिकपणाची आहे की मत चोरीची हे स्पष्ट होते, असेही वडेट्टीवार म्हणाले.