नागपूर : अकरावीच्या प्रवेशाची दुसरी फेरी संपली. या फेरीत ७ हजार विद्यार्थ्यांनी ज्युनिअर कॉलेजमध्ये प्रवेश घेतले. त्यामुळे आता दोन्ही फेरीतील प्रवेशाची आकडेवारी २० हजारावर पोहचली आहे. आणखी दोन फेऱ्या शिल्लक आहे. यात किमान ५ ते ७ हजार विद्यार्थी प्रवेश घेतील, असा कयास लावला जात आहे. यंदा किमान ५० टक्केवर जागा रिक्त राहतील आणि त्याचा फटका शिक्षकांना बसेल, त्यामुळे शिक्षक धास्तीत आहे.
गेल्या वर्षी अकराव्या वर्गाच्या शहरातील २१ हजार जागा रिक्त होत्या. यंदा हा आकडा ३० हजारावर जाणार आहे. एकतर एकूण जागेएवढी नोंदणीच झाली नाही. दुसरीकडे प्रवेश प्रक्रियेला उशीर झाल्याने अनेक विद्यार्थ्यांनी शहरालगतच्या ग्रामीण भागातील कॉलेजमध्ये प्रवेश घेतला आहे. त्यामुळे किमान ५० टक्के जागा रिक्त राहतील, अशी भीती ज्युनिअर कॉलेजच्या मुख्याध्यापकांनी व्यक्त केली. अकरावीच्या पहिल्या फेरीत १३४५४ प्रवेश निश्चित झाले होते. पहिल्या फेरीनंतर तब्बल दोन महिने प्रवेश प्रक्रिया ठप्प पडली होती. त्यामुळे कॉलेजमध्ये प्रवेश होतील की नाही, या भीतीपोटी २० टक्के विद्यार्थ्यांनी शहरालगतच्या ग्रामीण भागात प्रवेश केले. अकरावी प्रवेशाच्या दुसऱ्या फेरीत ९६७५ विद्यार्थ्यांची निवड झाली होती. त्यापैकी ६९९३ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केला. नागपूर शहरात एकूण ५९१७० जागा अकरावीच्या आहे. पण ४२५१५ विद्यार्थ्यांनीच नोंदणी केली आहे. त्यामुळे १६ हजार जागा रिक्त राहणारच होत्या. पण नोंदणी केलेले विद्यार्थीही प्रवेश घेत नसल्याचे आकडेवारीवरून दिसते आहे. शहरातील काही नामांकित महाविद्यालय सोडल्यास, इतर ज्युनिअर कॉलेजमध्ये मोठ्या प्रमाणात जागा रिक्त राहणार आहे.
- दुसऱ्या फेरीनंतरची स्थिती
शाखा एकूण जागा झालेले प्रवेश रिक्त जागा
कला ९६६० २४४९ ७२११
वाणिज्य १८००० ६०८८ ११९१२
विज्ञान २७३८० १०६९२ १६६८८
एमसीव्हीसी ४१३० १२१८ २९१२
- शहरात आणि शहरालगत वाढलेल्या स्वयंअर्थसाहाय्यित कॉलेज वाढले आहे. सायन्स आणि इंग्रजी कॉमर्सचे विद्यार्थी जे क्लासेस लावतात, त्यांचे कॉलेजशी टायअप असते. विद्यार्थी फक्त नावापुरते कॉलेजमध्ये प्रवेश घेतात. त्याचा फटका अनुदानित कॉलेजला बसतो आहे. अनुदानित कॉलेजला विद्यार्थीच उपलब्ध होत नसल्याने त्याचा परिणाम शिक्षकांवर होणार आहे. शिक्षकांची संच मान्यता झाल्यास मोठ्या प्रमाणात शिक्षक अतिरिक्त होणार आहे.
- डॉ. अशोक गव्हाणकर, महासचिव, विज्युक्टा