US Election 2020: भारतीयांना व्हिसाच्या समस्या सोडविण्याची अपेक्षा, सत्तेवर येणाऱ्या सरकारकडे लागले आहे लक्ष
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2020 06:42 IST2020-11-07T02:29:05+5:302020-11-07T06:42:53+5:30
US Election 2020:हॉस्टन येथील कर्करोग संशोधन केंद्रात कार्यरत मयुर गढीकर यांनी ट्रम्प यांच्यावर भारतीय नागरिक नाराज असल्याचे सांगितले.

US Election 2020: भारतीयांना व्हिसाच्या समस्या सोडविण्याची अपेक्षा, सत्तेवर येणाऱ्या सरकारकडे लागले आहे लक्ष
- अंकिता देशकर / नीलेश देशपांडे
नागपूर : निवडणुकीनंतर सत्तेवर येणाऱ्या सरकारद्वारे एच१-बी व्हिसा व अन्य विविध समस्या सोडविल्या जातील, अशी अपेक्षा अमेरिकेतील भारतीयांना आहे. ‘लोकमत’ने अमेरिकेतील काही वैदर्भीय नागरिकांशी संवाद साधून त्यांची भावना जाणून घेतली. २००० ते २०१८ या काळात अमेरिकेतील भारतीयांची संख्या सुमारे १५० टक्क्यांनी वाढली आहे. त्यामुळे अमेरिकेतील परदेशी नागरिकांमध्ये भारतीय द्वितीय स्थानावर आले आहेत. असे असले तरी त्यांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.
हॉस्टन येथील कर्करोग संशोधन केंद्रात कार्यरत मयुर गढीकर यांनी ट्रम्प यांच्यावर भारतीय नागरिक नाराज असल्याचे सांगितले. ट्रम्प यांच्या वक्तव्यामुळे भारतीयांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. तसेच, ट्रम्प यांनी एच१-बी व्हिसावर अनेक बंधने आणली आहेत. निवडणुकीनंतर सत्तेवर येणारे सरकार याकडे लक्ष देईल, अशी अपेक्षा आहे असे त्यांनी सांगितले.
ऑस्टीन येथील वरिष्ठ विश्लेषक आदित्य सरदेशपांडे यांनीही ट्रम्प यांच्यावर टीका केली. ज्यो बायडन जिंकल्यास विदेशी नागरिकांना दिलासा मिळेल, असे ते म्हणाले.
संस्कृती वाचविण्यासाठी कार्य
कोरोना संक्रमण योग्य पद्धतीने हाताळले नाही म्हणून, अमेरिकन नागरिक ट्रम्प यांच्यावर नाखूश असल्याची माहिती सॉफ्टवेअर इंजिनियर सुमेध साठे आणि पुष्कर कुलकर्णी यांनी सांगितले. टेक्निकल ॲनालिस्ट सुदेश केसकर यांनी येणाऱ्या काळात अमेरिकेत मोठे बदल पहायला मिळतील, असे सांगितले.