लोकमत विशेष
वसीम कुरेशी
नागपूर : नागपूर फ्लाईंग क्लब व्यवस्थापन आता प्रशिक्षणार्थींसह नागरिकांना क्लबशी निगडीत सूचना आणि इतर महत्त्वाची माहिती देण्यासाठी वेबसाईट सुरू करणार आहे. क्लब व्यवस्थापनाने त्याची तारीख अधिकृतरीत्या जाहीर केलेली नसली तरी फ्लाईंग क्लबच्या व्यवस्थापकीय संचालकांनी ही वेबसाईट लवकरच सुरू होणार असल्याची माहिती दिली.
१७ जून २०१७ पासून फ्लाईंग क्लबची उड्डाणे बंद आहेत. साडेसहा वर्षांत कोणतीही अद्ययावत माहिती अपडेट न केल्यामुळे अनेक प्रशिक्षणार्थी भोपाळ व हैदराबादला आपले उड्डाण पूर्ण करण्यासाठी निघून गेले. आता काही प्रशिक्षणार्थींसह काही शिष्यवृत्ती मिळविणारे विद्यार्थी अडकले आहेत. क्लबची उड्डाणे सुरू करण्याची पद्धत अद्यापही मंदगतीने सुरू आहे. परंतु, क्लबने चीफ फ्लाईंग इन्स्ट्रक्टर (सीएफआय) शिवाय एएफआय, चीफ ग्राऊंड इन्स्ट्रक्टर, स्टोअर किपर, सेफ्टी मॅनेजर, टेक्निकल ऑफिसरसह इतर पदांची नियुक्ती झाली की नाही, हे स्पष्ट केले नाही. मेन्टेनन्ससाठी आवश्यक ‘सबपार्ट (एफ)’ अप्रूव्हल मिळविले की नाही, याबाबतसुद्धा अपडेट देण्यात आले नाही. फ्लाईंग क्लबच्या संचालनासाठी आवश्यक फ्लाईट ट्रेनिंग ऑपरेशन (एफटीओ) ची मंजुरी डायरेक्टर जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशनच्या चमूने पाहणी केल्यानंतर शक्य होणार आहे. टीम केव्हा क्लबचा दौरा करणार आहे, याचा खुलासाही करण्यात आलेला नाही. या प्रश्नांसाठी सोमवारी नागपूर फ्लाईंग क्लबचे व्यवस्थापकीय संचालक मिलिंद साळवे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी प्रतिसाद दिला नाही. मेन्टेनन्सची परवानगी घेतल्याशिवाय येथे देखभालीची कामे केली जाऊ शकत नाही तसेच चीफ फ्लाईंग इन्स्ट्रक्टरच्या उपस्थितीशिवाय फ्लाईंग क्लबमध्ये उड्डाणाशी संबंधित हालचाली होऊ शकत नसल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
..........