नागपूर : भारतीय हवामानशास्त्र विभागाने नागपूरसहित नागपूर विभागाच्या इतर जिल्ह्यांना येल्लो अलर्ट जारी केला आहे. पूर्व विदर्भातील काही जिल्ह्यांना काही दिवस वारा आणि गारपिटीसह पावसाचा इशारा दिला आहे.
३ मेला नागपूरमध्ये गारपिटीसह जोरदार पाऊस झाला. यामुळे उन्हाच्या तडाख्यामुळे त्रस्त झालेल्या नागपूरकरांना गर्मीपासून काही काळ विश्रांती मिळाली. नागपूर हवामानशास्त्र विभागाने येणारे दोन ते तीन दिवस शहराला येल्लो अलर्ट जाहीर केला आहे. भंडाऱ्यात गुरुवारी ५ मिमी पावसाची नोंद झाली ज्यामुळे जिल्ह्याचे तापमान ३६ अंश सेल्सिअस पर्यंत कमी झाले होते.
विदर्भात सध्या कडक उन्हाळ्याचा तडाखा सुरू असतानाच हवामान विभागाने पूर्व विदर्भात अवकाळी पावसाचा इशारा दिला आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
विदर्भातील बहुतेक जिल्ह्यांमध्ये तापमानाने 45 अंशांचा टप्पा गाठलेला असतानाच अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. यामुळे पिकांचे नुकसान होण्याची शक्यता असून संबंधित यंत्रणांनी उपाययोजना ठेवाव्यात, असा सल्ला देण्यात आला आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, विदर्भातील यवतमाळ, वर्धा, भंडारा, चंद्रपूर आणि नागपूर या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. याठिकाणी आज ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. या भागांमध्ये गडगडाटी पावसाची शक्यता असल्यामुळे नागरिकांनी घराबाहेर न पडण्याचा सल्ला दिला जात आहे.