असंघटित कामगारांना मिळाला मदतीचा हात
By Admin | Updated: November 19, 2014 01:59 IST2014-11-19T01:59:29+5:302014-11-19T01:59:29+5:30
विदर्भातील ४0 कामगारांना शासनाची मदत, अकोला जिल्ह्यातील सर्वाधिक १८ कामगारांचा समावेश.

असंघटित कामगारांना मिळाला मदतीचा हात
अकोला : असंघटित कामगारांना अडचणीच्या वेळी शासनाकडून मदतीचा हात दिला जातो. ऑक्टोबर महिन्यात विदर्भातील अशा ४0 कामगारांना सात लाख रुपयांची मदत शासनाने केली. यामध्ये सर्वाधिक लाभ अकोला जिल्ह्यातील १८ असंघटित कामगारांना मिळाला आहे.
असंघटित, मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह करणार्या कामगारांसाठी आर्थिक मदतीची तरतूद शासन करीत असते. या योजनेचा लाभ शेकडो कामगार घेतात. कामगार मंडळ, कामगार कल्याण मंडळ व कामगार आयुक्त या कार्यालयांच्या माध्यमातून लाभार्थी कामगारांची निवड केली जाते. कामगारांच्या दुर्धर आजारपणात, अपघात झाल्यास, पाल्यांच्या शिक्षणासाठी, कुटुंबात गरोदरपणामध्ये आणि मोठय़ा शस्त्रक्रियेसाठी मदत व्हावी, या भावनेतून शासन आर्थिक मदत करीत असते. अलीकडच्या काळात अनेक असंघटित कामगार शासनाच्या या योजनेचा लाभ घेत आहेत.
दर महिन्यात मदतीसाठी प्राप्त अर्जातून पात्र कामगारांची निवड केली जाते व त्यांना मदतीचा धनादेश दिला जातो.
या योजनेतून ऑक्टोबर महिन्यात विदर्भातील ४0 कामगारांना जवळपास सात लाख रुपये मदत स्वरूपात मिळाले. यामध्ये सर्वाधिक १८ कामगार एकट्या अकोला जिल्ह्यातील आहेत.
अकोल्यातील कामगारांना तीन लाख रुपयांची मदत प्राप्त झाली आहे. त्याखालोखाल वर्धा आणि गडचिरोली जिल्ह्यातील प्रत्येकी सात, नागपूरमधील चार, चंद्रपूरमधे दोन, तर अमरावती आणि भंडारा या जिल्ह्यातील प्रत्येकी एका मजुराला मदतीचा धनादेश प्राप्त झाला आहे. या जिल्ह्यांना जवळपास चार लाख रुपयांची मदत प्राप्त झाली आहे.