‘अनलॉक’ प्रक्रिया अन् चित्रपटगृहांची फजिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 7, 2020 11:05 AM2020-11-07T11:05:19+5:302020-11-07T11:06:52+5:30

Cinema hall corona कोरोना नावाच्या ऐतिहासिक घटनाक्रमामुळे टाळेबंद असलेली चित्रपटगृहे तब्बल साडेसात महिन्यानंतर ‘अनलॉक’ करण्याची परवानगी मिळाली आहे. मात्र, चित्रपटगृहांचे पुन: संचलन अत्यंत कठीण झाले आहे.

The ‘unlock’ process and the humiliation of cinemas | ‘अनलॉक’ प्रक्रिया अन् चित्रपटगृहांची फजिती

‘अनलॉक’ प्रक्रिया अन् चित्रपटगृहांची फजिती

Next
ठळक मुद्देनवा सिनेमाच नाही तर रिलिज काय करणार?डागडुजी अन् साफसफाईला लागणार वेळ

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : बंद करणे जेवढे सोपे असते, तेवढेच कठीण सुरू करणे असते. चित्रपटगृहांसंदर्भात ही बाब तंतोतंत लागू पडतेय. कोरोना नावाच्या ऐतिहासिक घटनाक्रमामुळे टाळेबंद असलेली चित्रपटगृहे तब्बल साडेसात महिन्यानंतर ‘अनलॉक’ करण्याची परवानगी मिळाली आहे. मात्र, ज्या सहजतेने राज्य शासनाने हा निर्णय घेतला गेला त्याच सहजतेने चित्रपटगृहांचे पुन: संचलन अत्यंत कठीण झाले आहे.

चित्रपटक्षेत्राला अद्यापही उद्योगाचा दर्जा मिळाला नसला तरी मोठ्यात मोठ्या उद्योगापेक्षा हे क्षेत्र तसूभरही कमी नाही. एकसाथ हजारो कोटीची उलाढाल असलेल्या या क्षेत्राची चित्रपटगृहे ही जीवनवाहिनी आहेत. मात्र, टाळेबंदीने ही जीवनवाहिनी बाधित झाली. भलीमोठी इमारत, त्यात अत्याधुनिक सुविधा, निरंतर साफसफाई, वीज आदींनी सजलेले चित्रपटगृहे अचानक बंद पडली आणि जादूची छडी चालावी तशी ही गृहे एकाएकी वर्दळीला मुकली. तब्बल साडेसात महिने चित्रपटगृहे केवळ शोभेचा हत्ती बनून राहिली आणि त्याचा फटका मालक, कर्मचाऱ्यांना बसला.

आता दीर्घकाळानंतर चित्रपटगृहांना मिळालेली मोकळीक आनंद देणारी बाब असली तरी पुन्हा श्रीगणेशा अवघड झाला आहे. विशेष म्हणजे, किमान दहा दिवस तरी विस्कटलेल्या यंत्रणेची घडी व्यवस्थित करण्यात जाणार आहे. त्यातच सुरू झालेल्या चित्रपटगृहांत प्रेक्षकांना दाखवायचे काय, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. जे सिनेमे प्रेक्षकांनी आधीच बघितले आणि दूरचित्रवाणीवर आता दररोज दिसत आहेत. ते सिनेमे बघण्यासाठी प्रेक्षक सिनेमागृहांकडे कसे वळणार, या प्रश्नासोबतच कोरोना संसर्गाचा धोका अद्यापही जसाच्या तसाच असताना प्रेक्षक सिनेमागृहात येण्याची रिस्क घेतील का, असा सवाल आहे. विशेष म्हणजे, नवे चित्रपट रिलिज करण्यासाठी निर्मातेही पुढाकार घेत नसल्याने वितरकही हतबल झाले आहेत. या सर्व पेचात चित्रपटगृहांची फजिती झाली आहे.

प्रेक्षकांसोबतच चित्रपटगृहांनाही प्रतीक्षा

मार्चमध्ये टाळेबंदी लागू झाली तेव्हा अनेक मोठ्या बजेटची आणि प्रेक्षकांची उत्कंठा वाढविणारे सिनेमे रिलिजसाठी सज्ज होते तर अनेक चित्रपट पाईपलाईनमध्ये होते. टाळेबंदीत अनेक निर्मात्यांनी कन्टेंट शिळे होण्याच्या भीतीने ओटीटीचा पर्याय निवडला आणि निश्चित गुंतवणूक काढण्यासोबतच नफा कमावला. मात्र, प्रेक्षकांना चित्रपटगृहांपर्यंत खेचण्यात यशस्वी होणारे मोठ्या स्टार्सचे सिनेमे अजूनही बारगळले आहेत. प्रेक्षकांना खेचणारी अन् तोटा भरून काढणाऱ्या सिनेमांची प्रतीक्षा चित्रपटगृहांना आहे.

जानेवारीशिवाय नवे चित्रपट नाहीच!

संसर्गाचा प्रकोप मंदावला आहे आणि निश्चित दिलासा मिळण्याची अपेक्षा जानेवारीपर्यंत निर्मात्यांना आहे. त्यामुळे, दिवाळी, नाताळ हे सिनेमांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे सण चित्रपट रिलिजिंगशिवाय जाणार आहेत. त्यामुळे अनलॉक प्रक्रियेनंतरही चित्रपटगृहांना जानेवारीशिवाय पर्याय नसणार आहे.

मोठ्या बॅनरचे सिनेमे रिलिज झाल्यावरच चित्रपटगृहांमध्ये प्रेक्षकांची वर्दळ वाढणार आहे. त्यामुळे, आम्ही त्यांची वाट बघतो आहोत. १३ नोव्हेंबरला नवा चित्रपट येण्याची शक्यता आहे. तोवर चित्रपटगृहांची व्यवस्था होऊन जाईल.

- प्रतीक मुणोत, सीईओ, पंचशिल सिनेमा

 

Web Title: The ‘unlock’ process and the humiliation of cinemas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.