कुंभमेळ्याच्या माध्यमातून समाजाच्या एकतेचा योग : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
By आनंद डेकाटे | Updated: February 16, 2025 16:51 IST2025-02-16T16:48:45+5:302025-02-16T16:51:19+5:30
Nagpur : 'महाकुंभ प्रयाग योग ' कार्यक्रमाला उपस्थिती

Unity of society through Kumbh Mela: Chief Minister Devendra Fadnavis
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : प्रयागराज येथे सनातन संस्कृतीचे भव्य दर्शन घडविणारा कुंभमेळा सुरू आहे. आस्थेचा असा भव्य संगम जगात कुठेही पाहायला मिळणार नाही. मानवी संस्कृती आणि सभ्यतेमध्ये हजारो वर्षापासून हा संगम आपल्याला कुंभमेळ्याच्या निमित्ताने पाहायला मिळतो. भाविक जात, भाषा, पंथ विसरून कुंभमेळ्यात एकत्रित येतात. हा समाजाच्या एकतेचा योग असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
रेशीमबाग मैदानात आयोजित 'महाकुंभ प्रयाग योग' कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रविवारी उपस्थित होते. यावेळी ते बोलत होते. द सत्संग फाउंडेशन नागपूर केंद्राचे अध्यक्ष निवृत्त न्यायमूर्ती सुनील शुक्रे, राजेश लोया, अमेय मेटे आदी यावेळी उपस्थित होते.
५० कोटींपेक्षा जास्त भाविकांनी आतापर्यंत कुंभमेळ्यात स्नान केले. ज्या भाविकांना कुंभमेळ्यात जाण्याचा योग आला नाही त्यांच्यासाठी प्रयागराज येथील संगमावरील जल नागपुरात आणण्यात आले. यासाठी महाकुंभ प्रयाग योग कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यावेळी म्हणाले.
आजवर कोट्यवधी भाविकांनी महाकुंभादरम्यान प्रयागराज येथील त्रिवेणी संगमावर पवित्र स्नान केले आहे. पण ज्यांना तेथे जाणे शक्य नाही अशांनाही या पवित्र संगम जलाच्या स्नानाची अनुभूती व्हावी या अनुषंगाने प्रयागराज येथील जल रामटेकमार्गे नागपुरात आणण्यात आले होते. या अनुषंगाने महाकुंभ प्रयाग योग या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
मुख्यमंत्री कुंभमेळा- जोड : १४४ कलावंतांची चमू व शंखनाद
१४४ वर्षानंतर महाकुंभ मेळा प्रयाग येथे साजरा करण्यात येतो, नागपुरात प्रयाग योगासाठी १४४ गायक कलावंताच्या चमूने प्रारंभी भजन व संकीर्तन केले. यासोबतच ब्रिगेडियर सुहास कुळकर्णी यांच्या नेतृत्वातील चमूने शंखनाद केला. त्यानंतर कार्यक्रमस्थळी आलेल्या भाविकांना गंगाजलाभिषेकाची संधी उपलब्ध करुन देण्यात आली.