हिंदूंची एकजूट हाच विश्वधर्म
By Admin | Updated: January 9, 2015 00:49 IST2015-01-09T00:49:18+5:302015-01-09T00:49:18+5:30
हिंदू समाजाची एकजूट जेव्हा झाली तेव्हा भारतात बंधूतेचे वातावरण आले आणि सारेच आनंदात राहिले. हिंदू समाज जेव्हा विघटित झाला तेव्हा मात्र परकीयांची आक्रमणे झाली आणि देश गुलामगिरीत गेला,

हिंदूंची एकजूट हाच विश्वधर्म
जितेन्द्रनाथ महाराज : राष्ट्रधर्म कीर्तन महोत्सवाला प्रारंभ
नागपूर : हिंदू समाजाची एकजूट जेव्हा झाली तेव्हा भारतात बंधूतेचे वातावरण आले आणि सारेच आनंदात राहिले. हिंदू समाज जेव्हा विघटित झाला तेव्हा मात्र परकीयांची आक्रमणे झाली आणि देश गुलामगिरीत गेला, याचा इतिहास आहे. आज बऱ्याच काळानंतर हिंदू समाज एकत्रित होतो आहे आणि त्याचे सकारात्मक परिणामही आपल्याला दिसत आहेत. हिंदू एकजूट होत असल्याचे पाहून मात्र जग काळजीत पडले आहे. जगात हिंदू धर्मच शांतता निर्माण करू शकतो आणि जगाला मार्गदर्शन करू शकतो. त्यामुळे हिंदूंची एकजूट हाच विश्वधर्म आहे, असे मत देवनाथ पीठाचे आचार्य जितेंद्रनाथ महाराज यांनी गुरुवारी केले.
कीर्तन महोत्सव आयोजन समिती, महाल आणि राधागोविंद चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने राष्ट्रधर्म कीर्तन महोत्सवाचे आयोजन चिटणीस पार्क, महाल येथे करण्यात आले आहे.या महोत्सवाला गुरुवारपासून प्रारंभ करण्यात आला. याप्रसंगी द्वितीय मधुराद्वैताचार्य श्री बाबाजी महाराज पंडित कीर्तन परिसरात ‘देव, देश आणि धर्म’ विषयावरील उद्बोधनात ते बोलत होते. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून माजी खा. बनवारीलाल पुरोहित, दिलीप गुप्ता, प्रकाश वाघमारे, संयोजक श्रीपाद रिसालदार उपस्थित होते. महाराज म्हणाले, भगवान दत्ताला तीन मुखे आहेत तसेच देव, देश आणि धर्म आहे. देशाशिवाय देव नाही आणि देवाशिवाय देश नाही. धर्मपालनाशिवाय मात्र देव आणि देश यांचा काहीही अर्थ उरत नाही. हिंदूच्या एकजूटीने प्रथमच भारतीय संसदेला भारतमातेचे सर्वोच्च मंदिर म्हणणारा आणि त्याच्यासमोर नतमस्तक होणारा पंतप्रधान आपल्याला लाभला. देशाच्या प्रगतीसाठी भविष्यातही हिंदूंना एकजूट वाढवावी लागेल. भारताविषयी उपेक्षेने बोलणाऱ्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना आज तिरंग्याला सलाम करण्यासाठी भारतात येण्याची इच्छा आहे. पण काही लोक जाणीवपूर्वक हिंदूंची एकजूट तोडण्याचा प्रयत्न करीत आहे. जातीच्या नावावर आरक्षण देऊन हा भेद वाढविला जातो आहे. आरक्षणाला विरोध नाही पण ते जातीच्या आधारापेक्षा कमजोर वर्गाला दिले गेले पाहिजे. आपल्या देशात शिवाजी महाराजांचे चरित्र इयत्ता पहिली ते पाचवी शिकविले जाते. या काळात मुलांना काहीही कळत नाही. पाचवीनंतर मात्र कळायला लागल्यावर ब्रिटिशांचा इतिहास शिकविला जातो. राज्य शासनाने यात बदल करायला हवा. विकास महत्त्वाचा आहे पण त्याने संस्कार संपायला नको, असे ते म्हणाले.
संस्कार संपत असल्याने आमची संवेदनशीलता आणि नात्यांमधली वीणही सैल होते आहे. विकास हवा आहे पण संस्कारांसोबत हवा आहे. त्यासाठी आपला धर्म, देश आणि संस्कृती यांची जपणूक करण्याची गरज आहे. देशासमोर अनेक धोके आहे आणि त्यांना शह देण्याची शक्ती हिंदूच्या संघटनेतच आहे, यासाठी हिंदूंनी संघटित राहावे, असे आवाहन त्यांनी केले.
प्रारंभी कीर्तन महोत्सव समितीच्यावतीने भव्य शोभायात्रा काढण्यात आली. महाल परिसरात या शोभायात्रेचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले. वेदशास्त्रसंपन्न सूरज वाशिमकर आणि सहकारी यांनी अथर्वशीर्षाचे पठण केले. या महोत्सवाला दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राचे सहकार्य लाभले आहे. (प्रतिनिधी)