नागपूर - केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी देणारा निनावी कॉल आल्याने रविवारी सकाळी सुरक्षायंत्रणांची धापवळ उडाली. संबंधित फोन आल्यानंतर गडकरी यांच्या दोन्ही निवासस्थानांची सुरक्षा वाढविण्यात आली आहे. दरम्यान, संबंधित धमकी केवळ ‘फेक कॉल’ असल्याची बाब पोलीस अधिकाऱ्यांनी स्पष्ट केली आहे.
नितीन गडकरी यांचे मागील काही वर्षांपासून वर्धा मार्गावरील जयप्रकाशनगर मेट्रो स्थानक चौकातील एन्रिको हाईट्स येथे राहणे आहे. तर त्यांचे जुने घर महाल येथे आहे. तेथे नवीन घर बांधण्याचे काम सुरू आहे. रविवारी डायल ११२ वर अज्ञात व्यक्तीने फोन करून गडकरी यांचे घर बॉम्बने उडविण्याची धमकी दिली. याची माहिती नागपूर पोलीस नियंत्रण कक्षाला देण्यात आली. त्यानंतर तातडीने राणाप्रतापनगर व कोतवाली पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांना कळविण्यात आले.
खबरदारीचा उपाय म्हणून गडकरी यांच्या दोन्ही निवासस्थानांची सुरक्षा वाढविण्यात आली. दरम्यान, अज्ञात व्यक्तीने केलेला फोन हा केवळ ‘फेक कॉल’ असल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे. गडकरी यांच्या निवासस्थानी ते नागपुरात असताना चोख बंदोबस्त असतोच. मात्र त्यात आता आणखी वाढ करण्यात आली आहे.