केंद्राच्या कार्यपद्धतीवर संघ समाधानी
By Admin | Updated: March 14, 2015 02:41 IST2015-03-14T02:41:07+5:302015-03-14T02:41:07+5:30
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेला शुक्रवारी नागपुरातील रेशीमबाग स्मृतिमंदिर परिसरात सुरुवात झाली.

केंद्राच्या कार्यपद्धतीवर संघ समाधानी
नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेला शुक्रवारी नागपुरातील रेशीमबाग स्मृतिमंदिर परिसरात सुरुवात झाली. देशात झालेल्या राजकीय बदलानंतर प्रथमच होणाऱ्या या सभेत प्रतिनिधींचा उत्साह दिसून येत होता. संघाचे सरकार्यवाह भय्याजी जोशी यांनी केंद्र शासनाची कार्यपद्धती व उपक्रमांवर समाधान व्यक्त करताना ‘स्वच्छ भारत’ मोहीम तसेच गंगा सुरक्षा योजनेचे कौतुकदेखील केले.
अखिल भारतीय प्रतिनिधी सभेत संघ परिवारातील ३५ संघटनांचे १,४०० प्रतिनिधी सहभागी झाले आहेत. सकाळी ८.३० वाजता सरसंघचालक डॉ.मोहन भागवत व भय्याजी जोशी यांच्या हस्ते या सभेचे उद्घाटन झाले. यावेळी सहसरकार्यवाह सुरेश सोनी, दत्तात्रेय होसबळे, डॉ. कृष्णगोपाल, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह, संघटनमंत्री रामलाल, विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रवीण तोगडिया हे प्रामुख्याने उपस्थित होते.
सरसंघचालकांनी सर्व प्रतिनिधींचे स्वागत केले व राष्ट्रनिर्माणासाठी आणखी जोमाने कार्य करण्याचे आवाहन केले. भय्याजी जोशी यांनी २०१४-१५ चा वार्षिक अहवाल सभेसमोर मांडला. देशात सत्ताबदल झाल्यानंतर नागरिकांमध्ये नवी आशा पल्लवीत झाली आहे. केंद्र सरकारचे काम योग्य दिशेने सुरू आहे. स्वच्छता मोहीम, गंगा संवर्धनसारखे उपक्रम नक्कीच अभिनंदनीय आहेत. यात जनतेचा सहभाग वाढविण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे व यातूनच अनेक समस्यांचा तोडगा काढता येईल. केंद्र शासनाने देशाची सुरक्षा, स्वाभिमान व सार्वभौमत्व अबाधित राहण्यावर भर दिला पाहिजे, असे प्रतिपादन जोशी यांनी केले. यावेळी त्यांनी संघाच्या शारीरिक, बौद्धिक व प्रचार विभागांच्या कामाचा लेखाजोगा मांडला. सोबतच विविध प्रांतांमध्ये झालेल्या विविध कार्यक्रम, उपक्रम व विस्तार कार्यांवर प्रकाश टाकला. दुपारच्या सत्रात संघ परिवारातील काही संघटनांनी संक्षिप्तपणे त्यांच्या वार्षिक अहवालाचे कथन केले.