नागपुरात गुणवंत विद्यार्थिनीचा दुर्दैवी अंत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2020 00:02 IST2020-07-20T23:59:56+5:302020-07-21T00:02:45+5:30
बारावीच्या परीक्षेत ९२ टक्के गुण मिळाल्यामुळे आनंदात असलेल्या विद्यार्थिनीचा तिच्या घरातच टेबलमध्ये पाय अडकून पडल्याने मृत्यू झाला. या घटनेमुळे अवघ्या कुटुंबावरच मानसिक आघात झाला आहे.

नागपुरात गुणवंत विद्यार्थिनीचा दुर्दैवी अंत
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : बारावीच्या परीक्षेत ९२ टक्के गुण मिळाल्यामुळे आनंदात असलेल्या विद्यार्थिनीचा तिच्या घरातच टेबलमध्ये पाय अडकून पडल्याने मृत्यू झाला. या घटनेमुळे अवघ्या कुटुंबावरच मानसिक आघात झाला आहे. आंचल मोरेश्वर वानखेडे असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे.
हुडकेश्वर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील संभाजीनगरात राहणाऱ्या आंचलला बारावीच्या परीक्षेत ९२ टक्के गुण मिळाले. त्यामुळे दोन दिवसांपासून वानखेडे परिवारातील आनंद गगनात मावेनासा झाला होता. या आनंदातच रविवारी दुपारी मोरेश्वर वानखेडे बाहेर गेले. त्यांची पत्नी, मुलगी आंचल आणि तिची छोटी बहीण अशा तिघी मायलेकी घरात होत्या. आंचलने आपल्या बहिणीला आणि आईला फोटो काढण्यासाठी तयार होण्यास सांगितले. या तिघीही तयार झाल्या. मोबाईलमध्ये फोटो काढताना अचानक आंचलचा पाय टेबलमध्ये अडकून ती डोक्याच्या भारावर खाली पडली. तिला गंभीर दुखापत झाल्यामुळे घरच्यांनी तिला इस्पितळात दाखल केले. तेथील डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. या घटनेमुळे कुटुंबातील सदस्यांवर तीव्र मानसिक आघात झाला आहे. शेजारीही हळहळ व्यक्त करीत आहेत. अत्यंत हुशार असलेली आंचल एमबीए करण्याची महत्त्वाकांक्षा बाळगून होती.