अनियंत्रित बोलेरोचा नागपुरातील जरीपटक्यात हैदोस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2017 00:58 IST2017-12-16T00:57:27+5:302017-12-16T00:58:33+5:30
बोलेरोच्या चालकाने गुरुवारी रात्री जरीपटक्यात हैदोस घातला. अनेक वाहनांना धडक देत एका नगरसेवकाचा बळी घेतला तर काहींना जखमी केले. गुरुवारी रात्री ७.४५ वाजता घडलेल्या या थरारामुळे कामगारनगर, जरीपटक्यात प्रचंड दहशत निर्माण झाली होती.

अनियंत्रित बोलेरोचा नागपुरातील जरीपटक्यात हैदोस
आॅनलाईन लोकमत
नागपूर : बोलेरोच्या चालकाने गुरुवारी रात्री जरीपटक्यात हैदोस घातला. अनेक वाहनांना धडक देत एका नगरसेवकाचा बळी घेतला तर काहींना जखमी केले. गुरुवारी रात्री ७.४५ वाजता घडलेल्या या थरारामुळे कामगारनगर, जरीपटक्यात प्रचंड दहशत निर्माण झाली होती.
कस्तुरबा गांधी वॉर्ड भंडारा येथील रहिवासी गजानन रामाजी शेंडे (वय ३९) यांच्या तक्रारीनुसार, एमएच ४०/ एएफ ९६०२ क्रमांकाच्या भरधाव बोलेरो चालकाने कामठीतील नगरसेवक नरेंद्र भुटानी (वय ६५) यांच्या अॅक्टीव्हाला जोरदार धडक मारली. ते खाली पडले असतानाच आरोपी चालकाने शेंडे यांच्या अॅक्टीव्हाला धडक मारली. त्यानंतरही वाहनाचा वेग कमी न करता आरोपी बोलेरो चालकाने पुन्हा एका वाहनाला धडक मारली. यानंतर आरोपीचे वाहन अडकले. त्यामुळे आरोपी बोलेरोचालक पळून गेला. या अपघातामुळे घटनास्थळी प्रचंड गर्दी आणि तणाव निर्माण झाला. जमावाने जखमी भुटानी आणि इतरांना इस्पितळात नेले असता भुटानींना डॉक्टरांनी मृत घोषित केले. भुटानी हे वेकोलिचे निवृत्त अधिकारी असून, कामठीचे नगरसेवक आहेत. त्यांच्या मृत्यूचे वृत्त कळताच कामठीतील अनेक समर्थक गुरुवारी रात्री मेयोत पोहचले. दरम्यान, शेंडे यांच्या तक्रारीवरून जरीपटका पोलिसांनी आरोपी बोलेरो चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला.
जखमी व्यक्तीचे निधन
२० नोव्हेंबरला दुपारी १२ च्या सुमारास सोनेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या अपघातात गंभीर जखमी झालेले सलिम खान रशम खान पठाण (वय ४०, रा. जुना दिघोरी) यांचा करुण अंत झाला. अपघातानंतर त्यांना
उपचाराकरिता मेडिकलमध्ये दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान गुरुवारी दुपारी १.४५ च्या सुमारास डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. मिळालेल्या सूचनेवरून सोनेगाव पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. पुढील तपास सुरू आहे.