‘चाचा पीएमओ है हमारे’, एअरपोर्ट ऑथोरिटीत नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली बंटी-बबलीकडून ७ लाखांचा गंडा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2025 23:32 IST2025-10-30T23:31:12+5:302025-10-30T23:32:07+5:30
Nagpur Fraud News: एअरपोर्ट ऑथोरिटी ऑफ इंडियात नोकरी लावून देण्याची बतावणी करत एका दांपत्याने वृद्ध व्यक्तीला ७ लाखांचा गंडा घातला.

‘चाचा पीएमओ है हमारे’, एअरपोर्ट ऑथोरिटीत नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली बंटी-बबलीकडून ७ लाखांचा गंडा
मुलाला एअरपोर्ट ऑथोरिटी ऑफ इंडियात नोकरी लावून देण्याची बतावणी करत एका दांपत्याने वृद्ध व्यक्तीला ७ लाखांचा गंडा घातला. बजाजनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. विजय सदाशिव बन्सोड (६१, एनआयटी कॉलनी, अत्रे ले आऊट) असे तक्रारदाराचे नाव आहे.
विजय सदाशिव बन्सोड हे एका वर्तमानपत्रात व्यवस्थापक म्हणून कार्यरत आहेत. त्यांचा मुलगा तेजस हा खाजगी नोकरी करत होता. भाच्याच्या माध्यमातून त्यांची रोहित ओमप्रकाश थूल (४०, चिचभुवन) व त्याची पत्नी शुभांगी सोमस्कर-थूल (३०) हिच्यासोबत ओळख झाली.
रोहितने मला नोकरी लावून दिल्याचे भाच्याने सांगितले होते. आरोपींनी त्याचे काका भूषण थूल हे पंतप्रधान कार्यालयात मोठ्या पदावर कार्यरत असल्याचा दावा केला. तसेच मी एअरपोर्ट ऑथोरिटी ऑफ इंडियात कार्यरत असल्याचे आरोपीने सांगितले.
तेजसला तेथेच सहायक अभियंता पदावर नोकरी लावून देण्याची बतावणी त्याने केली. त्याने बन्सोड यांच्याकडून ७.०७ लाख रुपये घेतले. त्याने फेब्रुवारी २०२५ मध्ये बन्सोड यांच्या व्हॉट्सअपवर नियुक्तीपत्रदेखील पाठविले. मात्र ते बनावट निघाले.
आरोपींनी बन्सोड यांचे पैसे देण्यासदेखील नकार दिला. अखेर बन्सोड यांच्या तक्रारीवरून आरोपींविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.