मामा-मामीनेच नोकरीच्या नावे भाचीला १.२८ कोटींनी गंडविले

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2025 14:34 IST2025-07-05T14:34:10+5:302025-07-05T14:34:46+5:30

Nagpur : गडचिरोलीतील शिक्षण संस्थेत अध्यक्षपद देण्याचे दाखविले आमिष

Uncle and aunt duped niece of Rs 1.28 crore in the name of job | मामा-मामीनेच नोकरीच्या नावे भाचीला १.२८ कोटींनी गंडविले

Uncle and aunt duped niece of Rs 1.28 crore in the name of job

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर :
शालार्थ आयडी घोटाळा गाजत असताना आता गडचिरोलीतील एका शिक्षण संस्थेत अध्यक्षपद व नोकरी देण्याच्या नावाखाली काही जणांची लुबाडणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. आश्चर्याची बाब म्हणजे संस्थेतील आरोपींपैकी एक जण फसवणूक झालेल्या महिलेचा मामाच आहे. आरोपींनी महिलेला तब्बत १.२८ लाखांचा गंडा घातला. हुडकेश्वर पोलिस ठाण्यात या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


भारती संजय हरकंडे (५०, न्यू अमरनगर, मानेवाडा) असे तक्रारदार महिलेचे नाव आहे. तर तिचा मामा निळकंठ दशरथ दहीकर (६०, देसाईगंज, गडचिरोली), त्याची पत्नी सविता दहीकर (५२), मुलगी आशू दहीकर (३०), पुतण्या राहुल धनोजी दहीकर (३५) व गुलाब धोंडबा दहीकर (४५) अशी आरोपींची नावे आहेत. हे सर्व देसाईगंज येथील शांतीवन अपंग निराधार आदिवासी विकास शिक्षण संस्थेचे काम पाहतात. संबंधित संस्थेचे अध्यक्षपद देण्याची बतावणी निळकंठ दहीकरने केली व भारती त्याच्या बोलण्यात अडकल्या. त्यांनी शाहूनगर येथे भारती यांच्याकडून त्यासाठी ४८ लाख रुपये घेतले. त्यानंतर त्याने भारती यांची बहीण अनिता तरवटकर यांच्या पतीला शिक्षण संस्थेत नोकरी देण्याच्या नावाखाली ४५ लाख रुपये मागितले. तसेच भारती यांचे पती संजय हरकंडे यांना शिक्षण संस्थेत उपाध्यक्षपद देऊ शकतो असे म्हणून १५ लाखांची मागणी केली. मामा-मामीच असल्याने काम होईलच या विश्वासाने भारती व त्यांच्या पतीने आरोपींना पैसे दिले. त्यानंतर आरोपींनी भारती यांच्या इतर नातेवाईकांनादेखील शिक्षण संस्थेत नोकरी लावून देतो असे म्हणून वेगवेगळ्या तारखांना २० लाख रुपये घेतले. भारती यांनी आरोपींना २०११ ते २०२४ या कालावधीत एकूण १.२८ कोटी रुपये दिले. मात्र आरोपींनी ना भारती यांना अध्यक्षपद दिले ना कुणालाही नोकरी लावून दिली.


भारती यांनी आरोपींना पैसे परत मागितले असता त्यांनी ४८ लाखांचा धनादेश दिला. मात्र तो वटलाच नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर भारती यांनी हुडकेश्वर पोलिस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी सर्व आरोपींविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.


बनावट ठराव करून अध्यक्षपद दिल्याचा केला फार्स
भारती यांचे पती संजय हरकंडे हे सैन्यातून निवृत्त झाले असून ते आता खासगी व्यवसाय करतात. आरोपींनी २०२० साली ब्रम्हपुरी येथील मागासवर्गीय सुशिक्षित बेकार एज्युकेशन सोसायटी व शांतीवन निराधार शिक्षण संस्था या दोन्ही शिक्षण संस्थांचे अध्यक्षपदाचे प्रमाणपत्र दिले. संस्थेतील सदस्यांचा लेखी ठराव घेऊन अध्यक्षपद दिल्याची बतावणी आरोपींनी केली. मात्र अध्यक्षपदासाठी कुठलीही निवडणूक झाली नाही व बनावट ठराव करून हा प्रकार करण्यात आल्याची बाब समोर आली.

Web Title: Uncle and aunt duped niece of Rs 1.28 crore in the name of job

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :nagpurनागपूर