उन्हाळी प्रवास सुखद करण्यासाठी रेल्वेची योजना, गर्दीचे नियंत्रण अन् प्रवाशांच्या सुरक्षेवर भर
By नरेश डोंगरे | Updated: March 4, 2025 19:53 IST2025-03-04T19:53:18+5:302025-03-04T19:53:30+5:30
Nagpur News: उन्हाळ्यात प्रवास करताना रेल्वे प्रवाशांची गैरसोय होऊ नये, त्यांचा प्रवास सुखद आणि सुरक्षित व्हावा, यासाठी मध्य रेल्वेच्या प्रशासनाने वेगवेगळ्या उपाययोजना हाती घेतल्या आहेत. या योजनांची अंमलबजावणी करताना हलगर्जीपणा होऊ नये, याबाबत संबंधितांना निर्देश देण्यात आले आहे.

उन्हाळी प्रवास सुखद करण्यासाठी रेल्वेची योजना, गर्दीचे नियंत्रण अन् प्रवाशांच्या सुरक्षेवर भर
- नरेश डोंगरे
नागपूर - उन्हाळ्यात प्रवास करताना रेल्वे प्रवाशांची गैरसोय होऊ नये, त्यांचा प्रवास सुखद आणि सुरक्षित व्हावा, यासाठी मध्य रेल्वेच्या प्रशासनाने वेगवेगळ्या उपाययोजना हाती घेतल्या आहेत. या योजनांची अंमलबजावणी करताना हलगर्जीपणा होऊ नये, याबाबत संबंधितांना निर्देश देण्यात आले आहे.
अन्य ऋतुंच्या तुलनेत उन्हाळ्यात प्रवास करणारांची संख्या अचानक वाढते. शाळा-महाविद्यालयांना सुट्या लागत असल्याने प्रवाशांच्या गर्दीत वाढ होते. दुसरीकडे काही प्रांतात उन्हाळ्यात कामाच्या संधी कमी होतात आणि काही प्रदेशात रोजगारांच्या संधी वाढतात. त्यामुळे कामगार वर्गांची ईकडून तिकडे जा-ये वाढत असल्याने रेल्वे गाड्यां प्रवाशांनी भरभरून धावत असल्याचे दिसते. प्रवाशांची अचानक गर्दी वाढल्याने अनेक गाड्यांमध्ये पाय ठेवायला जागा मिळत नाही. दुसरीकडे गर्दीचे नियंत्रण करणे कठीण होते. त्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होते. दरवर्षीचा हा अनुभव लक्षात घेऊन यंदा मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने प्रवाशांची गैरसोय होऊ नये आणि त्यांना प्रवास करताना जास्तीत जास्त चांगल्या सुविधा देता यावे म्हणून आतापासूनच उपाययोपजना सुरू केल्या आहेत.
गर्दी व्यवस्थापन
प्रवाशांच्या मदतीसाठी विशेष मदत केंद्र आणि अतिरिक्त तिकीट बुकिंग काऊंटर सुरू करण्यात आले आहेत. प्रवाशांना त्रास होऊ नये यासाठी विविध स्थानकांवर रेल्वे कर्मचारी आणि आरपीएफ जवान तैनात करण्यात आले आहेत. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची व्यवस्था करण्यात आली आहे.
पिण्याच्या पाण्याची सुविधा
विविध रेल्वे स्थानकांवर स्वच्छ पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. ज्या रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची गर्दी मोठी असते अशा अनेक स्थानकांवर वॉटर वेंडिंग मशीन, पाणपोई आणि अतिरिक्त वॉटर कूलर बसविण्यात आले आहेत.
आरामदायक व्यवस्था
ठिकठिकाणच्या रेल्वे स्थानकांवरील प्रतीक्षालये तसेच रिटायरिंग रूममध्ये वातानुकूलन प्रणाली आणि पंख्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. वातानुकूलित प्रतीक्षालयांची नियमित देखभाल आणि दुरुस्ती व्हावी म्हणून विशेष नियोजन करण्यात आले आहे.
वैद्यकीय सुविधा
मोठ्या आणि नागपूरसारख्या प्रमुख रेल्वे स्थानकांवर २४ बाय ७ वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी प्राथमिक उपचार पेट्या तसेच वैद्यकीय कर्मचारी कार्यरत राहिल, अशी व्यवस्था करण्यात आली आहे.
स्वच्छता मोहीम
उन्हाळ्यात घाण, कचरा होऊ नये म्हणून विविध स्थानकांवर विशेष स्वच्छता मोहिमा राबविण्यात येत आहे. प्रतीक्षालये, प्लॅटफॉर्म आणि प्रवासी डब्यांची स्वच्छता वारंवार होईल, असे नियोजन करण्यात आले आहे.