राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात उद्धव ठाकरेंना धक्का बसेल; भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांचा दावा
By योगेश पांडे | Updated: September 8, 2022 17:05 IST2022-09-08T17:00:36+5:302022-09-08T17:05:13+5:30
विदर्भातील एकही कार्यकर्ता उद्धव ठाकरेंसोबत राहणार नाही, असा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला.

राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात उद्धव ठाकरेंना धक्का बसेल; भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांचा दावा
नागपूर : शिवसेनेचे अनेक कार्यकर्ते व प्रमुख पदाधिकारी भाजपच्या संपर्कात आहेत. मागील अडीच वर्षातील महाविकास आघाडीच्या कारभाराला ते कंटाळले. आता जनतेच्या मनातील सरकारमध्ये त्यांना काम करायचे आहे. असे सांगत, प्रत्येक जिल्ह्यात शिवसेनेला (उद्धव ठाकरे गट)मोठे खिंडार पडेल असे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.
पुढे बोलताना, उद्धव व आदित्य ठाकरेसोबत सेना कार्यकर्ते रहायला तयार नाही. २०२४ पर्यंत त्यांच्याकडे फार कमी कार्यकर्ते राहतील व २०१९ मध्ये केलेली चूक त्यांना कळेल. ठाकरे यांनी भाजपसोबत केलेल्या विश्वासघाताचा बदला जनता मतदानातून घेईल. वेट अँड वॉच, आशचर्यचकीत व्हाल असे भाजपमध्ये पक्षप्रवेश होतील. विदर्भातील एकही कार्यकर्ता उद्धव ठाकरेंसोबत राहणार नाही, असा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला.
गुरुवारी नागपूरात शिवसेनेचे अमरावती जिल्हाप्रमुख राजेश वानखडे, उपजिल्हाप्रमुख बोरखेडे यांच्यासह विविध पदाधिकाऱ्यांचा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश झाला. तिवसा, अमरावती येथील ५ हजार कार्यकर्त्यांसह त्यांनी प्रवेश केला. शिवसेना पक्षातील बहुतांश कार्यकर्ते भाजपात आल्याचा बावनकुळे यांचा दावा आहे. २०१९ मध्ये वानखडे यांना ६६ हजार मतं मिळाली होती. आता ते अमरावती लोकसभा मतदारसंघाचे संयोजक म्हणून काम करतील. अमरावतीत जिल्हाप्रमुख राजेश वानखेडे यांच्या भाजप प्रवेशामुळे शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे.