जगात वाढत आहे टाईप-१ मधुमेह
By Admin | Updated: July 27, 2015 04:14 IST2015-07-27T04:14:49+5:302015-07-27T04:14:49+5:30
जगात टाईप-१ वर्गातील मधुमेह वाढत आहे. पूर्वी लहान मुलांच्या डॉक्टरांकडे साधारण तीन वर्षांत या आजाराचे

जगात वाढत आहे टाईप-१ मधुमेह
वामन खाडिलकर : इंडियन अकॅडमी आॅफ पीडियाट्रिक्सची कार्यशाळा
नागपूर : जगात टाईप-१ वर्गातील मधुमेह वाढत आहे. पूर्वी लहान मुलांच्या डॉक्टरांकडे साधारण तीन वर्षांत या आजाराचे दोन-तीन रुग्ण दिसायचे, आता दोन महिन्यात एक-दोन मुले आढळून येत आहेत. या आजारातील रुग्णाच्या शरीरात इन्सुलिन निर्मिती होत नसल्याने इन्सुलिनचे इंजेक्शन घेणे हाच उपचार आहे. अशा रुग्णांना दिवसातून तीन आणि जास्तीतजास्त पाचवेळा इन्सुलिन घ्यावे लागते. हा आजार अनुवांशिक नाही. इन्सुलिन घेणाऱ्या भावंडातही हा आजार दिसून येण्याची शक्यता असते, अशी माहिती पुणे येथील केईएम हॉस्पिटलचे डॉ. वामन खाडिलकर यांनी दिली.
इंडियन अकॅडमी आॅफ पिडियाट्रिक्स, नागपूर शाखेच्यावतीने ‘लहान मुलांमधील हार्मोन्स’ या विषयावर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते मुख्य मार्गदर्शक म्हणून बोलत होते.
- पालकांना माहीत असावीत याची लक्षणे
डॉ. खाडिलकर म्हणाले, टाईप-१ वर्गातील मधुमेह हा व्हायरसमुळे होणाऱ्या आजारातून, आहारातील प्रदूषणामुळे किंवा हार्मोन्समध्ये ढवळाढवळ करणाऱ्या एखाद्या घटकामुळे होऊ शकतो. न्यूझिलॅन्डमध्ये एका मुलाला गाईच्या दुधातून हा आजार झाल्याचे समोर आले आहे. या आजाराची लक्षणे म्हणजे पाणी जास्त पिणे, वारंवार लघवी होणे, पूर्वी जे गादीवर लघवी करीत नव्हते ते करायला लागणे. धक्कादायक म्हणजे, या आजाराच्या लक्षणाची माहिती अनेकांना राहत नसल्याने निम्मे रुग्ण बेशुद्ध व गंभीर अवस्थेतच डॉक्टरांकडे येतात. (प्रतिनिधी)
समाजात जनजागृती आवश्यक
या आजाराला घेऊन समाजात व्यापक प्रमाणात जनजागृती होणे आवश्यक आहे. विशेषत: शाळेतील शिक्षकांना या आजाराची माहिती असणे व अशा रुग्णांना शाळेत इन्सुलिन्स घेण्यासाठी वेगळा कक्ष असणे आवश्यक आहे. मात्र अनेक पालक आपल्या मुलाला हा आजार असल्याचे लपवून ठेवतात आणि येथूनच मोठ्या समस्या निर्माण होतात.
सरकारने नि:शुल्क इन्सुलिन्स उपलब्ध करावे
भारतात दिवसेंदिवस हा आजार वाढत आहे. सर्वच स्तरावरील कुटुंबांमध्ये हा आजार होऊ शकतो. या आजारावरील उपचाराचा खर्च मोठा आहे. यामुळे गरीब रुग्ण उपचाराविना राहतात. त्यांच्यात मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. देशात केवळ कर्नाटक आणि केरळमध्ये इन्सुलिन्स मोफत मिळते. महाराष्ट्रातही ही सोय किमान शासकीय रुग्णालयांमध्ये तरी उपलब्ध करून देणे आवश्यक आहे.
ग्रोथ चार्टचे पालन करणे महत्त्वाचे
वयाच्या प्रमाणात लहान मुलांचे वजन, उंची किती असावी, यावर जागतिक आरोग्य संघटनेचे (डब्ल्यूएचओ) ‘ग्रोथ चार्ट’आहे. डब्ल्यूएचओचा हा चार्ट शून्य ते पाच वर्षांपर्यंत मुलांसाठी ‘स्टॅण्डर्ड’ आहेत. मात्र भारतीय मुलांचे आरोग्य संस्थेने सर्वेक्षण करून पाच ते १० वर्षांपर्यंतच्या मुलांसाठी नव्याने ग्रोथ चार्ट तयार केला आहे. मुलांवर योग्य उपचार करण्यासाठी प्रत्येक बालरोग तज्ज्ञांनी या चार्टचा उपयोग करावा, असे आवाहनही त्यांनी केले. या कार्यशाळेत डॉ. सुधा राव यांनी ‘हायपोथॉयरॉयडिझम’ म्हणजे थायरॉईड ग्रंथीतील स्राव कमी होणे यावर, तर डॉ. हरी मंगतानी यांनी कमी वयात येणारी पौगंडावस्था यावर मार्गदर्शन केले. कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी इंडियन अकॅडमी आॅफ पिडियाट्रिक्सचे अध्यक्ष डॉ. आर.जी. पाटील, सचिव डॉ. गिरीश चरडे यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.