लोकमत न्यूज नेटवर्क बुटीबोरी : मशीन चालू असताना शॉफ्ट तुटला आणि मशीनचा ड्रम फेकला गेला. त्या ड्रमखाली दबल्या गेल्याने दोन कामगारांचा मृत्यू झाला तर एक कामगार गंभीर जखमी झाला. ही घटना बुटीबोरी (ता. नागपूर ग्रामीण) एमआयडीसी परिसरातील केमटेक इंडिया कंपनीत रविवारी (दि. २२) रात्री ७ वाजताच्या सुमारास घडली.
योगेंद्र घुमलाल दमाहे (३०, रा. जयगुनटोला, ता. वाराशिवनी, जिल्हा बालाघाट) व नवदीप क्षीरसागर (२६, रा. पिपरिया, जिल्हा बालाघाट) अशी मृत तर रामसागर शाहू (६५, रा. बिहार) असे गंभीर जखमी कामगारांची नावे आहेत. जखमी कामगारावर नागपूर शहरातील एम्स हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.
बुटीबोरी एमआयडीसी परिसरातील केमटेक इंडिया नामक कंपनीमध्ये कॅल्शियम पावडर तयार केले जाते. रविवारी रात्री या कंपनीत १० कामगार काम करीत होते. दरम्यान, पावडर तयार करीत असताना मशीनचा शॉफ्ट तुटल्याने मशीनचा ड्रम बाहेर फेकला गेला आणि हा ड्रम कामगारांच्या अंगावर पडला. या ड्रमखाली दबल्या गेलेल्या तीन कामगारांपैकी योगेंद्रचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर नवदीप व रामसागर गंभीर जखमी झाले.
अन्य कामगारांनी त्यांना ड्रमखालून बाहेर काढले आणि जखमी अवस्थेत उपचारासाठी जवळच्या हॉस्पिटलमध्ये भरती केले. तिथे काही वेळात नवदीपचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यानंतर रामसागरला नागपुरातील एम्स हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले. एमआयडीसी बुटीबोरी पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. शिवाय, दोघांचे मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी नागपूर शहरातील मेडिकल हॉस्पिटलमध्ये पाठविले. याप्रकरणात पोलिसांनी नोंद करून तपास सुरू केला आहे.