महिलेला गंभीर जखमी करून दुचाकी चालक फरार
By दयानंद पाईकराव | Updated: July 28, 2023 18:06 IST2023-07-28T17:58:44+5:302023-07-28T18:06:50+5:30
अजनी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील घटना

महिलेला गंभीर जखमी करून दुचाकी चालक फरार
नागपूर : रस्ता ओलांडत असलेल्या महिलेला धडक देत गंभीर जखमी करून दुचाकीचालक फरार झाला. ही घटना अजनी पोलिस ठाण्याच्या हद्दीत गुरुवारी सकाळी ९.३० वाजताच्या सुमारास घडली.
कमलाबाई यशवंतराव ब्राह्मणकर (वय ६२, रा. गुरुदेवनगर, बेसा रोड, अजनी) या आपल्या वहिनी सिताबाई विठोबा फुंडे (वय ६५) यांच्यासह मानेवाडा चौकातून ओमकारनगरकडे पायदळ रस्ता ओलांडत होत्या. तेवढ्यात अज्ञात दुचाकी चालकाने आपल्या ताब्यातील वाहन भरधाव वेगाने व निष्काळजीपणे चालवून सिताबाई यांना धडक मारून पळून गेला.
सिताबाई यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे त्यांना ओमकारनगर येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या प्रकरणी कमलाबाई ब्राह्मणकर यांनी दिलेल्या तक्रारीवरून अजनी पोलिसांनी अज्ञात वाहनचालकाविरुद्ध कलम २७९, ३३८ नुसार गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध सुरु केला आहे.