नागपूर जिल्ह्यातील मकरधोकडा तलावात दोघाना जलसमाधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2020 20:26 IST2020-06-26T20:20:40+5:302020-06-26T20:26:13+5:30
उमरेड तालुक्यातील मकरधोकडा तलावात दोघाचा बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक बाब उजेडात आली आहे. रोहित राकेश गोंडाने (१९) आणि कौशिक केशव लारोकर (१७) रा. शांतिनगर नागपूर अशी मृतांची नावे आहेत.

नागपूर जिल्ह्यातील मकरधोकडा तलावात दोघाना जलसमाधी
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर (उमरेड) : तालुक्यातील मकरधोकडा तलावात दोघाचा बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक बाब उजेडात आली आहे. रोहित राकेश गोंडाने (१९) आणि कौशिक केशव लारोकर (१७) रा. शांतिनगर नागपूर अशी मृतांची नावे आहेत. अन्य चार मित्रसुद्धा त्यांच्या सोबतीला होते अशीही बाब समोर येत आहे. शुक्रवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास ही घटना घडली. उमरेड येथून १२ किलोमीटर अंतरावर असलेल्या मकरधोकडा तलाव परिसरात नागपूर येथील सहा तरुण दुचाकी वाहनाने पोहोचले. सहा जणांपैकी रोहित गोंडाने आणि कौशिक लारोकर दोघे जण काही अंतरावर शौचास बसले. शौचविधी उरकवत असताना रोहित तलावात असलेल्या खोल खड्ड्यात बुडाला. अशातच कौशिकने आपल्या अन्य मित्रांना आवाज दिला. एकमेकांचा हात हातात घेत रोहितला वाचविण्याच्या प्रयत्नात कौशिकही या खड्ड्यात बुडाला. दोघांनाही जलसमाधी मिळाली. दोघांनाही वाचविण्याचा पुरेपूर प्रयत्न चौघांनीही केला. तोपर्यंत उशीर झाला होता. उमरेड पोलीस ठाण्यात २ वाजून ४५ मिनिटांनी याबाबत माहिती मिळाली. काही मासेमारी करणाऱ्या लोकांकडून प्रेत शोधण्याचे कार्य करण्यात आले. काही तासाच्या शोधमोहिमेनंतर सायंकाळी ६.३० वाजताच्या सुमारास दोघांचेही प्रेत मिळाले. उमरेड पोलीस ठाण्यात सदर घटनेचा मर्ग दाखल करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक विलास काळे यांनी दिली.
मित्रांनी प्रयत्न केला
या संपूर्ण घटनाक्रमात आधी रोहित त्यानंतर त्याला वाचविण्याच्या प्रयत्नात कौशिकचा बळी गेला. सोबतच मिहीर रमेश चावला (१८), अतुल वसंता धार्मिक (२६), हर्ष राजेश राहाटे (१८), आर्यन सुनील सहारे (१६) चौघेही सर्व रा. शांतिनगर नागपूर हे सुद्धा मकरधोकडा येथे होते. चौघांनीही शर्थीचे प्रयत्न केले. पण त्यात ते विफल ठरले. मकरधोकडा तलावातील या परिसरात पंप हाऊस आहे. एमआयडीसीला पाणीपुरवठा करण्यासाठी याठिकाणी खोल खड्डा आहे. या खड्ड्यातच दोन्ही तरुणांचा हकनाक जीव गेला. यावेळी नागरिकांची प्रचंड गर्दी उसळली होती.