उन्मादाचे दोन बळी; नायलॉन मांजामुळे ५० च्यावर लोक जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2025 18:35 IST2025-01-15T18:32:56+5:302025-01-15T18:35:10+5:30

Nagpur : पतंगाच्या मागे धावत असताना हृदयविकाराचा झटका येऊन एका तरुणाचा मृत्यू

Two victims of hysteria; over 50 injured due to nylon rope | उन्मादाचे दोन बळी; नायलॉन मांजामुळे ५० च्यावर लोक जखमी

Two victims of hysteria; over 50 injured due to nylon rope

लोकमत न्यूज नेटवर्क 
नागपूर :
मकर संक्रांतीच्या नावाखाली मंगळवारी दिवसभर पतंगबाजीचा उन्माद पाहायला मिळाला. नायलॉन मांजामुळे मेयो, मेडिकलसह खासगी रुग्णालयात जवळपास ५० वर जखमींवर उपचार करण्यात आले. धक्कादायक म्हणजे, पतंगाच्या मागे धावत असताना हृदयविकाराचा झटका येऊन एका तरुणाचा मृत्यू झाला, तर पतंग उडवित असताना अचानक तोल जाऊन पाचव्या मजल्यावरून खाली पडून एका युवकाचा मृत्यू झाला.


आपल्या संस्कृतीचा आनंद साजरा करताना दुसऱ्याचा बळी घेणे किंवा जखमी करणे हे कुठेही सांगितलेले नाही, पण तरीही दिवसभर हे पतंगबाज रस्त्यांवर, घराच्या छतांवर अक्षरशः धुमाकूळ घालीत होते. पतंगबाजांचा हा उन्माद आणि मस्ती उतरविण्यासाठी कठोर कायदे करण्यात आले असतानाही, त्याची विशेष अंमलबजावणी होताना आज दिसून आलेली नाही. अनेक ठिकाणी पतंगबाजांचा उन्माद सुरूच होता.


तोल गेला आणि पाचव्या मजल्यावरून खाली पडला 
सोहेल खान सलीम खान (२३) रा. गिट्टीखदान दुसऱ्या मृताचे नाव आहे. प्राप्त माहितीनुसार, पाच मजल्यांवरील इमारतीवर सोहेल खान हा पतंग उडवित होता. त्या इमारतीच्या पाचव्या मजल्यावर सुरक्षा भिंत नव्हती. पतंग उडविण्याच्या नादात त्याचा तोल गेला आणि खाली पडला. त्याला गंभीर जखमी अवस्थेत मेयो हॉस्पिटलमध्ये आणण्यात आले. दरम्यान, उपचार सुरू असताना डॉक्टरांनी मृत घोषित केले.


१७ टाके लागले चेहरा कापल्यामुळे 
मंगळवारी सकाळी १०:३० वाजताच्या सुमारास मानकापूर उड्डाणपुलावरून एक महिला आपल्या दुचाकीने कामाच्या ठिकाणी जात असताना, अचानक समोर आलेल्या नायलॉनच्या मांजाने तिच्या हेल्मेटची काच कापून तिचा चेहरा कापला गेला. तातडीने मानकापूर येथील मॅक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये (अॅलेक्सिस) दाखल करण्यात आले. चेहऱ्यावर १७ टाके लागल्याचे सांगण्यात येते. महिलेच्या पतीने सांगितले, तिने घरून दुपट्टा बांधला होता. हेल्मेटही होता.


मेयो-मेडिकलमध्ये १७ जखमींवर उपचार 
मेयो, मेडिकलमध्ये सायंकाळपर्यंत मांजामुळे जखमी झालेल्या १७ जखमींवर उपचार करण्यात आले. मेयोमध्ये सकाळच्या पाळीत तीन तर दुपारनंतर पाच असे सात जखमींवर उपचार करण्यात आले. मेडिकलमध्ये दिवसभरात १० जखर्मीवर उपचार करण्यात आले. यातील ७५ वर्षीय वृद्धाचा मांजाने पाय कापल्याने त्यांना वॉर्ड १७ मध्ये भरती करण्यात आले, तर १७ वर्षीय मुलाचे बोट गंभीररीत्या कापले गेल्याने वॉर्ड १५ मध्ये भरती करण्यात आले.


मित्रांसोबत पतंगाचा आनंद घेत असतानाच आला मृत्यू 
रितेश गंधश्रीवार (२७) रा. हुडकेश्वर त्या मृत तरुणाचे नाव. मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास रितेश आपल्या चार-पाच मित्रांसोबत घरासमोरील मैदानात पतंग पकडण्यासाठी धावत होता. काही वेळानंतर तो मित्रासोबत हुडकेश्वर येथील पिपळा फाटा रोडवर नाश्ता करण्यासाठी गेला. रितेशने नाश्ता न करता छातीत दुखत असल्याचे सांगून औषधी घेण्यासाठी औषधी दुकानात आला असताना तिथेच कोसळला. मित्रांनी खासगी रुग्णालयात नेले. मेडिकलमध्ये मृत घोषित केले.
 

Web Title: Two victims of hysteria; over 50 injured due to nylon rope

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :nagpurनागपूर