दुबार नाव असलेल्यांपुढे दोन स्टार, हमीपत्र लिहून घेणार
By आनंद डेकाटे | Updated: November 5, 2025 17:46 IST2025-11-05T17:45:28+5:302025-11-05T17:46:48+5:30
जिल्हाधिकारी डाॅ. इटनकर : अंतिम मतदार यादी उद्या प्रसिद्ध होणार

Two stars in front of those with double names, will write a guarantee
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : दोन अथवा जास्त ठिकाणी मतदान यादीत नोंद असलेल्या मतदाराच्या यादीतील नावापुढे दोन स्टार चिन्हांकित केले जाईल. या मतदाराकडून आधीच तो कोणत्या ठिकाणी मतदान करणार, हे लिहून घेतले जाईल. तसे आवाहन केले जाईल. दोन ठिकाणी नाव असले तरी तो एकाच ठिकाणी मतदान करेल. ज्याने आदी लिहून दिले नसेल आणि तो मतदार एखाद्या केंद्रात मतदानाला गेल्यास तिथे त्याच्याकडून हमीपत्र लिहून घेतले जाईल त्यानंतरच त्याला तेथे मतदान करू दिले जाईल, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डाॅ. विपीन इटनकर यांनी दिली.
नागपूर जिल्ह्यातील १५ नगर परिषद आणि १२ नगर पंचायती अशा एकूण २७ स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूकीबाबत नियोजन भवन येथे बुधवारी झालेल्या पत्रकार परिषदेत डॉ. विपीन इटनकर माहिती देत होते. त्यांनी सांगितले की, १ जुलै रोजीची मतदार यादी निवडणुकीसाठी ग्राह्य धरण्यात आली आहे. त्यामुळे आता त्या यादीमध्ये एकही नाव कमी करणे किंवा जोडणे शक्य नाही. तसेच त्या यादीमध्ये काही नावे दुबार असल्याची शक्यता आहे. अशी दुबार नावे शोधली जात आहे. ७ तारखेला प्रभागनिहाय अंतिम मतदारयादी जाहीर होईल. या मतदार यादीमध्ये दोन किंवा इतर ठिकाणी नावे असलेल्या मतदारांच्या नावापुढे दोन स्टार चिन्हांकित केले जाईल. तत्पूर्वी अशा दुबार नाव असलेल्या मतदारांना कुठल्याही एकाच ठिकाणी मतदार करता येणार आहे. यासाठी निवडणूक विभागातर्फे त्यांना आवाहन केले जाईल.अशा मतदारांच्या घरी जाऊन निवडणूक कर्मचारी त्यांच्याकडून कुठे मतदान करणार याबाबत लेखी लिहून घेतली.
ज्यांनी तसे लिहून दिले नाही आणि मतदानाच्या वेळी ते मतदार केंद्रावर मतदान करण्यासाठी गेले. तरी त्यांच्या नावापुढे दोन स्टार असल्याने अशा लोकांची ओळख पटेल. तेव्हा मतदान केंद्रावर त्या मतदारांकडून हमीपत्र लिहून घेतले जाईल, त्यानंतरच त्यांना मतदान करता येईल, असे जिल्हाधिकारी डाॅ. इटनकर यांनी स्पष्ट केले.
पत्रकार परिषदेला जिल्हा पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी, निवासी उपजिल्हाधिकारी अनुप खांडे, जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, नगर परिषद व नगर पंचायत मुख्याधिकारी यावेळी उपस्थित होते.
यंत्रणा सज्ज
नागपूर जिल्ह्यातील १५ नगर परिषद आणि १२ नगर पंचायतीसाठी निवडणूक होणार आहे. निवडणूक आयोगाच्या निर्देशांनुसार निवडणुका मुख्य, निर्भय व निष्पक्ष, पारदर्शक वातावरणात पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज आहे. निवडणुकांसाठी नामनिर्देशनपत्र दाखल करण्यास १० नोव्हेंबर २०२५ पासून सुरुवात होईल. नामनिर्देशपत्र दाखल करण्याची अंतिम तारीख १७• नोव्हेंबर २०२५ असेल. नामनिर्देशनपत्रांची छाननी १८ नोव्हेंबर २०२५ रोजी होईल. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या निर्णयाविरुद्ध अपील नसलेल्या ठिकाणी २१ नोव्हेंबर २०२५ पर्यंत; तर अपील असलेल्या ठिकाणी २५ नोव्हेंबर २०२५ पर्यंत नामनिर्देशनपत्रे मागे घेता येतील. २ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० पर्यंत मतदानाची वेळ असेल. मतमोजणी सर्व संबंधित ठिकाणी ३ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी १० वाजल्यापासून सुरु होईल. निकाल जाहीर झाल्यानंतर नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या क्षेत्रापुरती आचारसंहिता संपुष्टात येईल.
साडेचार हजार अधिकारी- कर्मचारी
नगरपरिषद व नगरपंचायतीच्या माध्यमातून ५४६ सदस्य व २७ नगराध्यक्ष निवडले जाणार आहेत. एकूण ३७४ प्रभाग असणार आहेत. २७ निवडणूक निर्णय अधिकारी तर २७ सहायक निवडणूक अधिकारी कार्यरत असणार आहे. सुमारे ४,४५५ अधिकारी व कर्मचारी या निवडणूक प्रक्रियेत प्रत्यक्षपणे सहभागी होतील.