झोपडपट्टीतील दोन मुली तयार करणार उपग्रह!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2021 07:29 IST2021-01-06T01:55:49+5:302021-01-06T07:29:35+5:30
देशभरातील एक हजार विद्यार्थ्यांमध्ये निवड. मनपाच्या शाळांची अवस्था सर्वांना परिचित आहे. पण सुरेंद्रगड हिंदी माध्यमिक शाळेतील या मुलींनी विद्यार्थ्यांनी मनपाच्या शाळेतही गुणवत्ता ठासून भरल्याचा परिचय दिला आहे.

झोपडपट्टीतील दोन मुली तयार करणार उपग्रह!
- मंगेश व्यवहारे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : तामिळनाडूतील रामेश्वरम येथे ७ फेब्रुवारीला जागतिक रेकॉर्ड बनविण्याची तयारी सुरू आहे. देशभरातील १ हजार विद्यार्थी १०० उपग्रह बनवित आहेत. ते एकाचवेळी अंतराळात झेपावण्याचा विक्रम होणार आहे. यासाठी देशभरातून निवडलेल्या १००० विद्यार्थ्यांमध्ये नागपूर महापालिकेच्या सुरेंद्रगड हिंदी माध्यमिक शाळेच्या दोन विद्यार्थिनींची निवड झाली आहे. झोपडपट्टीत राहणाऱ्या या मुली आहेत.
मनपाच्या शाळांची अवस्था सर्वांना परिचित आहे. पण सुरेंद्रगड हिंदी माध्यमिक शाळेतील या मुलींनी विद्यार्थ्यांनी मनपाच्या शाळेतही गुणवत्ता ठासून भरल्याचा परिचय दिला आहे. डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाऊंडेशनचा हा उपक्रम आहे. यात देशभरातून शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची निवड केली जाते. शालेय जीवनात अंतराळ तंत्रज्ञानाविषयी जिज्ञासा निर्माण करून भविष्यात स्पेस टेक्नॉलॉजीमध्ये विद्यार्थ्यांचे योगदान वाढावे ही यामागील संकल्पना आहे. यात जगातील सर्वात कमी वजनाचे १०० उपग्रह बनवून ७ फेब्रुवारी रोजी ३८००० मीटर उंचीवर सोडण्यात येणार आहेत. हे उपग्रह प्रत्यक्ष वातावरणाची माहिती घेऊन पृथ्वीवरील केंद्राला पाठवतील. हा एक जागतिक विक्रम होणार आहे. यासाठी सुरेंद्रगड शाळेच्या विद्यार्थ्यांनी ऑनलाईन फॉर्म भरले होते. यात स्वाती मिश्रा व काजल शर्मा या दोन विद्यार्थिनींची निवड झाली.
आमचे विद्यार्थी यापूर्वीही मंगळ अभियानात सहभागी झाले होते. आता रामेश्वरम येथे प्रस्थापित होणाऱ्या जागतिक विक्रमासाठी आमच्या शाळेच्या विद्यार्थ्यांची निवड होणे हे गौरवास्पद बाब आहे. स्लम भागातील ही मुले आहेत. पण शाळेतील मुख्याध्यापक व शिक्षकांनी या मुलांच्या क्षमतेचा पूर्णपणे वापर केला आहे.
- दीप्ती बिस्ट, विज्ञान शिक्षिका, सुरेंद्रगड हिंदी माध्यमिक शाळा