एमबीबीएसला प्रवेशाचे आमिष दाखवून दोघांना ७५ लाखांनी लुबाडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2025 17:40 IST2025-01-23T17:40:09+5:302025-01-23T17:40:45+5:30

Nagpur : दोन मुलींच्या शैक्षणिक वर्षाचे नुकसान

Two people were duped of Rs 75 lakhs by promising admission to MBBS | एमबीबीएसला प्रवेशाचे आमिष दाखवून दोघांना ७५ लाखांनी लुबाडले

Two people were duped of Rs 75 lakhs by promising admission to MBBS

लोकमत न्यूज नेटवर्क 
नागपूर :
नीटमध्ये कमी गुण मिळालेल्या दोन मुलींचे मॅनेजमेंट कोट्यातून एमबीबीएसला (मेडिकलमध्ये) अॅडमिशन करून देण्याची बतावणी करून त्यांची ७५ लाख ७५ हजारांची फसवणूक करणाऱ्या ५ आरोपींविरुद्ध लकडगंज पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.


परिमल कोटपल्लीवार, त्याची पत्नी, मिलिंद चवड आणि नितीन मल्लतवार, अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. हिरा सिद्धार्थ सहारे (५२, रा. बाबा दीपसिंगनगर, उप्पलवाडी कपिलनगर) यांची मुलगी २०२३ मध्ये बारावी पास झाली. तिला डॉक्टर व्हायचे होते; परंतु नीट परीक्षेत कमी गुण मिळाल्यामुळे तिचा मेडिकलला नंबर लागला नाही. त्यामुळे सहारे यांनी वृत्तपत्रात जाहिरात पाहून लकडगंज पोलिस ठाण्याच्या हद्दीत ब्लॉक नं. ४/३२ गांधी ग्रेन मार्केट, जयमल सुझुकी शो- रूमसमोर, टेलिफोन एक्स्चेंज येथील आर. के. एज्युकेशन काउन्सलिंग सेंटरशी संपर्क साधला. तेथे आरोपींनी त्यांच्या मुलीला मॅनेजमेंट कोट्यातून पाँडिचेरी येथील श्री लक्ष्मी नारायण इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स येथे प्रवेश मिळवून देतो अशी बतावणी करून त्यासाठी ८५ लाख रुपये खर्च येणार असल्याचे सांगितले. त्यानंतर आरोपींनी ८ सप्टेंबर २०२४ ते १५ जानेवारी २०२५ दरम्यान हिरा यांच्याकडून डीडी व ऑनलाइन, असे एकूण ३० लाख ७५ हजार रुपये घेतले. प्रवेशासाठी त्यांनी टाळाटाळ केली. हिरा यांनी प्रवेश न झाल्यामुळे रक्कम परत मागितली असता आरोपींनी त्यांना चेक दिले; परंतु ते चेकही बाउन्स झाले. त्यामुळे हिरा यांनी दिलेल्या तक्रारीवरून लकडगंज पोलिसांनी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.


सावनेरमधील विद्यार्थिनीचीही फसवणूक 
आरोपींनी सावनेर येथील चंद्रशेखर शंकर बावणे यांच्या मुलीचेही मॅनेजमेंट कोट्यातून प्रवेश करून देण्यासाठी ४५ लाख रुपये घेऊन त्यांची फसवणूक केल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे आरोपींनी आणखी काही व्यक्तींची फसवणूक केली असल्यास त्यांनी लकडगंज पोलिस ठाण्यात संपर्क साधण्याचे आवाहन वरिष्ठ पोलिस निरीक्षक हेमंत चंदेवार यांनी केले आहे.

Web Title: Two people were duped of Rs 75 lakhs by promising admission to MBBS

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.