उपराजधानीत दोन नवे डायलिसिस केंद्र!
By Admin | Updated: August 7, 2015 02:50 IST2015-08-07T02:50:08+5:302015-08-07T02:50:08+5:30
मूत्रपिंडाच्या (किडनी) आजारात जीवनदायी असणाऱ्या केवळ चार डायलिसिस मशीन्सवर विदर्भासह शेजारच्या राज्यातील रुग्णांचा भार आहे.

उपराजधानीत दोन नवे डायलिसिस केंद्र!
मेयो व मेडिकलमध्ये होण्याची शक्यता : मुख्यमंत्र्यांच्या सचिवांची पाहणी
लोकमत शुभवर्तमान
नागपूर : मूत्रपिंडाच्या (किडनी) आजारात जीवनदायी असणाऱ्या केवळ चार डायलिसिस मशीन्सवर विदर्भासह शेजारच्या राज्यातील रुग्णांचा भार आहे. सुपर स्पेशालिटी रुग्णालयातील नऊपैकी पाच मशीन्स बंद पडल्या आहेत. परिणामी या गंभीर व खर्चिक आजाराशी झगडत असणाऱ्या रुग्णांना एक तर जीवघेण्या प्रतीक्षेला सामोरे जावे लागत आहे. यावर उपाय म्हणून शहरात दोन नवे डायलिसिस सेंटर उघडण्याच्या संदर्भात मुख्यमंत्र्यांचे सचिव प्रवीण दराडे यांनी बुधवारी मेडिकलचे तर गुरुवारी मेयो व रुग्णालयातील जागेची पाहणी केली.
दोन्ही मूत्रपिंड कायमस्वरूपी किंवा तात्पुरत्या स्वरूपात निकामी झालेल्या रु ग्णाला डायलिसिस करण्याशिवाय पर्याय नसतो. विदर्भात केवळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाशी (मेडिकल) संलग्न असलेल्या सुपर स्पेशालिटी रुग्णालयात ही सोय उपलब्ध आहे. परंतु सुपरमधील डायलिसिस विभागातील नऊपैकी पाच मशीन बंद पडल्या आहेत. केवळ चार मशीनवर विभाग सुरू आहे. या मशीनवर रुग्णांचा भार वाढल्याने रु ग्णांवर दीर्घ प्रतीक्षा करण्याची वेळ आली आहे. याची गंभीर दखल मुख्यमंत्र्यांनी घेतल्याचे समजते. सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी सायंकाळी दराडे यांनी मेडिकलशी संलग्न असलेल्या सुपर स्पेशालिटी रुग्णालयाची पाहणी केली. त्यांना या डायलिसिस सेंटरला ट्रेनिंग सेंटरच्या रूपातही उपयोगात आणायचे आहे. यासाठी तीन ते चार हजार स्क्वेअर फूट जागा हवी आहे. ही जागा सुपर स्पेशालिटी रुग्णालयात उपलब्ध नसल्याचे दिसून आले. गुरुवारी सकाळी १० वाजता दराडे यांनी इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेयो) जागेची पाहणी केली. यावेळी मेयोचे प्रभारी अधिष्ठाता डॉ. मधुकर प्रचंड यांनी रुग्णालय परिसरातील विविध तीन-चार जागांची माहिती दिली. सध्या जागा ठरली नसली तरी शहरात डायलिसिस सेंटर होण्याची शक्यता आहे. दराडे यांच्यासोबतच मुख्यमंत्री कार्यालयाच्या विशेष कार्य अधिकारी आशा पठाण व नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती श्याम वर्धने, अधीक्षक मोहन खामगावकर, डॉ. प्रशांत जोशी व मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे उपस्थित होते. (प्रतिनिधी)