नागपुरात सराफा व्यापाऱ्याचे दोन लाख लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2018 20:24 IST2018-02-22T20:19:41+5:302018-02-22T20:24:08+5:30
सराफा व्यापाऱ्याच्या नोकराकडून लॉकरमध्ये ठेवण्यासाठी घेऊन जात असलेली दोन लाखांची रोकड दोन आरोपींनी मधल्यामध्ये लंपास केली. बुधवारी सायंकाळी ६.३० वाजता इतवारी टांगा स्टॅण्डजवळ ही घटना घडली.

नागपुरात सराफा व्यापाऱ्याचे दोन लाख लंपास
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सराफा व्यापाऱ्याच्या नोकराकडून लॉकरमध्ये ठेवण्यासाठी घेऊन जात असलेली दोन लाखांची रोकड दोन आरोपींनी मधल्यामध्ये लंपास केली. बुधवारी सायंकाळी ६.३० वाजता इतवारी टांगा स्टॅण्डजवळ ही घटना घडली.
आकाश रोशन गुप्ता (वय २१) हा तरुण व्ही. गोल्ड ज्वेलर्समध्ये काम करतो. त्याच्या मालकाने त्याला बुधवारी सायंकाळी एका बॅगमध्ये घालून पाच लाख रुपये दिले. ते त्याला इतवारीतील एका खासगी लॉकरमध्ये ठेवायचे होते. आकाश तिकडे पायी जात असताना रस्त्यात त्याला दोन आरोपी भेटले. एकाने समोरून तर दुसऱ्याने मागे उभे राहून, त्याची कोण आहे, कुठे जातो, बॅगमध्ये काय ठेवले आहे अशी चौकशी केली. आकाशने त्यांना त्याची माहिती दिली. दरम्यान, एकाने त्याच्या खांद्यावर हात ठेवला तर दुसऱ्याने दोन हजारांच्या नोटांचे एक बंडल बॅगमधून काढून घेतले. त्यानंतर काहीच झाले नाही, अशा थाटात आरोपी निघून गेले. आकाश लॉकर असलेल्या ठिकाणी पोहचला. त्याने आपल्या बॅगमधून रोकड काढली तेव्हा तीनच लाख रुपये होते. एक दोन लाखांचे बंडल गायब होते. रस्त्यात रोखणाऱ्या आरोपींनीच ते काढून घेतल्याचे आकाशच्या लक्षात आले. त्यामुळे त्याने मालकांना तशी माहिती दिली. त्यानंतर तहसील ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलीस उपनिरीक्षक अंबोरे यांनी चोरीचा गुन्हा दाखल केला.
सीसीटीव्हीची तपासणी
दोन लाखांची रोकड लंपास करणाऱ्या त्या दोन आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले आहे. त्या आधारे आरोपींचा शोध घेतला जात आहे.