मेयोच्या ‘ओपीडी’त पंखा पडल्याने दोन जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2019 23:11 IST2019-07-18T23:08:51+5:302019-07-18T23:11:02+5:30
इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या (मेयो रुग्णालय) बाह्यरुग्ण विभागात ३८ क्रमांकाच्या कक्षात लावलेला सिलींग फॅन अचानक खाली पडला. त्यामुळे कक्षाजवळ उभे असलेले दोन जण जखमी झाले. ही घटना गुरुवारी दुपारी १.३० वाजता घडली.

मेयोच्या ‘ओपीडी’त पंखा पडल्याने दोन जखमी
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या (मेयो रुग्णालय) बाह्यरुग्ण विभागात ३८ क्रमांकाच्या कक्षात लावलेला सिलींग फॅन अचानक खाली पडला. त्यामुळे कक्षाजवळ उभे असलेले दोन जण जखमी झाले. ही घटना गुरुवारी दुपारी १.३० वाजता घडली.
पंखा खाली पडल्याच्या घटनेनंतर बाह्यरुग्ण विभागाच्या परिसरात नागरिकांची गर्दी जमा झाली. पंखा अचानक खाली पडल्यामुळे रुग्णालय प्रशासनावर प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मेयो रुग्णालयात अनेक ठिकाणी जागोजागी अव्यवस्था असल्यामुळे रुग्णांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. सुदैवाने पंखा खाली पडला तेव्हा तेथे जास्त नागरिक नव्हते. परंतु हज यात्रेकरूंसोबत आलेले दोघे पंखा लागल्यामुळे जखमी झाले. आजूबाजूला उभ्या असलेल्या नागरिकांनी तातडीने दोघांनाही उपचारासाठी मेयो रुग्णालयाच्या अपघात विभागात दाखल केले. अपघात विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार पंखा पडल्यामुळे निशाद कुरेशी नावाची महिला आणि अकरम शाह हे जखमी झाले आहेत.