दोन दिवस हुलकावणी देणाऱ्या पावसाची शनिवारी हजेरी, सोमवारपासून उघडीप
By निशांत वानखेडे | Updated: September 30, 2023 20:29 IST2023-09-30T20:28:48+5:302023-09-30T20:29:12+5:30
साेमवारी गांधी जयंतीपासून नागपूरसह विदर्भातील बहुतेक जिल्ह्यात पाऊस थांबणार असून भंडारा, गाेंदिया व गडचिराेली जिल्ह्यात मात्र पुढचे आठ दिवस ढगाळ वातावरणासह तुरळक पाऊस हाेण्याचा अंदाज आहे.

दोन दिवस हुलकावणी देणाऱ्या पावसाची शनिवारी हजेरी, सोमवारपासून उघडीप
नागपूर : पावसाचा अंदाज असूनही दाेन दिवस हुलकावणी देणाऱ्या पावसाने शनिवारी हजेरी लावली. पावसाच्या सरी तासभर बरसल्या. पावसाचा हा आनंद आजच्या दिवसापुरता असण्याची शक्यता आहे. साेमवारी गांधी जयंतीपासून नागपूरसह विदर्भातील बहुतेक जिल्ह्यात पाऊस थांबणार असून भंडारा, गाेंदिया व गडचिराेली जिल्ह्यात मात्र पुढचे आठ दिवस ढगाळ वातावरणासह तुरळक पाऊस हाेण्याचा अंदाज आहे.
२५ सप्टेंबरपासून परतीच्या प्रवासाला लागलेला नैऋत्य मान्सून गेले दाेन-तीन दिवस जागेवर स्थिरावला हाेता. आता ताे पुन्हा वेगाने पुढे सरकत आहे. ५ ते १० ऑक्टाेबरदरम्यान ताे विदर्भासह महाराष्ट्रातून निराेप घेईल. मात्र राज्यातील काही भाग वगळता परतीचा पाऊस बरण्याची शक्यता कमी असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. केवळ भंडारा, गाेंदिया व गडचिराेलीत ताे ८ ऑक्टाेबरपर्यंत सक्रिय राहण्याची शक्यता आहे.
दरम्यान शुक्रवारी सायंकाळपासून विदर्भातील बहुतेक जिल्ह्यात पावसाने जाेरदार हजेरी लावली. गडचिराेली शहर तसेच जिल्ह्यातील कुरखेडा भागात दमदार सरी बरसल्या. चंद्रपूर जिल्ह्यातही राजुरापर्यंत पाऊस सक्रिय हाेता. अकाेला, अमरावती, भंडारा, वर्धा जिल्ह्यातही चांगल्या सरी बरसल्या. नागपूर शहरातील काही भागात शुक्रवारी रात्री पाऊस पडला. जिल्ह्यातील रामटेक तालुक्यात पावसाने दमदार हजेरी लावली. शहरात शनिवारी सायंकाळी ४ ते ५ वाजतापर्यंत पावसाच्या सरी जाेरात बरसल्या. आतापर्यंतची स्थितीनुसार पूर्व विदर्भात पाऊस सरासरीत असून पश्चिम विदर्भात अमरावती, अकाेला, वाशिम, बुलढाण्यात कमतरता कायम आहे आणि ती भरून निघण्याची शक्यता आता कमीच दिसून येत आहे.