परफ्युम घ्यायला गेले अन सूपर बाजार लुटण्यासाठी धमकावले, कॉंग्रेसनगरात थरार
By योगेश पांडे | Updated: August 22, 2023 18:17 IST2023-08-22T18:16:24+5:302023-08-22T18:17:45+5:30
दुकानातील कर्मचाऱ्यांनी एका आरोपीला धरले

परफ्युम घ्यायला गेले अन सूपर बाजार लुटण्यासाठी धमकावले, कॉंग्रेसनगरात थरार
नागपूर : धंतोली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कॉंग्रेसनगर परिसरातील एका सूपरबाजारमध्ये आलेल्या दोन आरोपींनी ग्राहकांना लुटण्याचा प्रयत्न केला तसेच शस्त्राचा धाक दाखवून धमकावले. दुकानातील कर्मचाऱ्यांनी समयसूचकता दाखविल्यामुळे एकाला ते पकडू शकले तर दुसऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली. या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली होती.
ओम उर्फ चिन्ना शोभा राठोड (२२, अजनी रेल्वे क्वॉर्टर) व अमन सुरेंद्र बिंचुलकर (१९, जोशीवाडी, अजनी) अशी आरोपींची नावे आहेत. कॉंग्रेसनगरमध्ये बेस्ट सूपर बाजार आहे. दोन दिवसांअगोदर रात्री साडेआठ ते नऊ वाजताच्या दरम्यान दोघेही तेथे गेले. एकाने सूपर बाजारातून परफ्युमची बॉटल घेतली मात्र त्याने पैसेच दिले नाही. ड्युटीवरील सुरक्षारक्षक अवधेश गौतम (५३) यांनी त्याला विचारणा केली असता ओमने त्यांना धमकावले. बॉटल गाडीच्या डिक्कीत ठेवून तो परत काऊंटरवर आला व त्याने शिवीगाळ करत चाकू काढला. तेथे उभ्या असलेल्या ग्राहकाच्या हातातील सहाशे रुपये त्याने हिसकावले. बाहेर उभ्या असलेल्या अमननेदेखील चाकू दाखविला.
गौतम यांनी ओमला पकडण्याचा प्रयत्न केला असता दोन्ही आरोपींनी त्यांना मारहाण केली व जखमी केले. हा प्रकार पाहून दुकानातील सर्व कर्मचारी एकत्रित आले. दोन्ही आरोपी पळून जात असताना त्यांनी ओमला पकडले. धंतोली पोलीस ठाण्याला हा प्रकार कळविण्यात आला. कर्मचाऱ्यांनी ओमला पोलिसांच्या ताब्यात दिले. तर त्याला पोलिसी हिसका दाखविल्यानंतर त्याने अमनचा पत्ता सांगितला. अमनलादेखील पोलिसांनी अटक केली. गौतम यांच्या तक्रारीवरून दोन्ही आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपींची चौकशी केली असता बाहेर आणखी सहकारीदेखील उभे असल्याची माहिती त्यांनी दिली. इतर आरोपींचा शोध सुरू आहे.