Tuzech Dhamma Chakra he fire jaagavari ... Jayabuddha, Jaybhim's shout at Dikshabhoomi | तुझेच धम्म चक्र हे फिरे जगावरी... दीक्षाभूमीवर जयबुद्ध, जयभीमचा जयघोष
तुझेच धम्म चक्र हे फिरे जगावरी... दीक्षाभूमीवर जयबुद्ध, जयभीमचा जयघोष

ठळक मुद्दे बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी देश-विदेशातूनही आले अनुयायी

लोकमत  न्यूज  नेटवर्क
नागपूर : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी तथागत गौतम बुद्ध यांच्या समतानिष्ठ विचारांना पुनरुज्जीवित केले. हजारो वर्षे दारिद्र्याच्या अंधारात खितपत पडलेल्या समाजाची अस्मिता जागृत केली. नागपूरच्या दीक्षाभूमीवर धम्मदीक्षा घेऊन बुद्ध तत्त्वज्ञानाला समाजमनात रुजविण्याचे क्रांतिदर्शी कार्य पूर्ण केले. त्या महामानवाला अभिवादन करण्यासाठी मंगळवारी सायंकाळी दीक्षाभूमी परिसराला निळ्या महासागराचे स्वरूप आले होते. विशाल, उचंबळणारा, गर्जणारा आंबेडकरी अनुयायांचा हा भीमसागर देशभरातून आला होता. जय बुद्ध व जय भीमच्या जयघोषाने अख्खा परिसर दुमदुमून गेला होता.
हातात पंचशील ध्वज अन् शुभ्र वस्त्र परिधान केलेल्या निळ्या पाखरांचे थवे दीक्षाभूमीवर मंगळवारी रात्री उशिरापर्यंत उतरत होते. देशाच्या कानाकोपऱ्यातूनच नव्हे तर नेपाळ, थायलंड, जपान, श्रीलंका येथूनही अनुयायी दीक्षाभूमीवर आले होते. लाखो अनुयायांच्या गर्दीने दीक्षाभूमी फुलून गेली होती. युवकांच्या झुंडीच्या झुंडी ‘जयभीम’चा नारा देत गर्दीत सामील होत होती. गर्दी अफाट असली तरी सर्वच एकमेकांना सांभाळून घेत होते. देशाच्या कानाकोपºयातून आलेल्या अनुयायांची भाषा विविध असली तरी ‘जयभीम’ या एकाच शब्दाने मदतीचा हात समोर येत होते.
पवित्र अस्थिंच्या दर्शनासाठी लागल्या रांगा
दीक्षाभूमी येथील स्तुपामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र अस्थिंचे जतन केलेला कलश दर्शनार्थ ठेवण्यात आला आहे. या पवित्र अस्थिंचे दर्शन घेण्यासाठी अनुयायांची रांग लागली होती. दीक्षाभूमी परिसरातील बोधीवृक्षाला आकर्षक रोषणाईने सजविले होते. दीक्षाभूमीचा परिसर तेजाने न्हाऊन निघाला होता. समता सैनिक दलाचे सैनिक आपली सेवा व सुरक्षा पुरविताना दिसून आले. हजारो मैलावरून लाखोंच्या संख्येने येणाऱ्या  अनुयायांसाठी हजारावर संघटना सरसावल्या होत्या. पाण्यापासून ते भोजनदानाची चोख व्यवस्था त्यांनी केली होती.
वस्त्यावस्त्यांमधून निघाली रॅली
नागपूरच्या विविध वस्त्यांमध्ये ‘भीम रॅली’चे आयोजन करण्यात आले होते. दुपारी निघालेली रॅली सायंकाळी दीक्षाभूमीवर पोहचताच एकच जल्लोष होत होता. पांढऱ्या वस्त्रातील अनुयायी ‘जयभीम’च्या जयघोषात एकमेकांना शुभेच्छा देत होते. इंदोरा, टाकळी सीम, नारा, बेझनबाग, अंबाझरी, गोपालनगर, त्रिमूर्तीनगर, चंदननगर, जाटतरोडी, चंद्रमणीनगर, नवीन बाभुळखेडा, मानेवाडा, दिघोरी यासारख्या कितीतरी वस्त्यांमधून रॅली निघाल्या.


Web Title: Tuzech Dhamma Chakra he fire jaagavari ... Jayabuddha, Jaybhim's shout at Dikshabhoomi
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.