कौतुकास्पद! उद्योगांच्या मदतीने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ शिकवणार कार्पोरेट प्रशासन
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2025 22:44 IST2025-07-16T22:43:39+5:302025-07-16T22:44:30+5:30
एमआयडीसी इंडस्ट्रीज असोसिएशन सोबत विद्यापीठाचा सामंजस्य करार

कौतुकास्पद! उद्योगांच्या मदतीने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ शिकवणार कार्पोरेट प्रशासन
आनंद डेकाटे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर: शैक्षणिक क्षेत्र आणि उद्योग यामधील दरी भरून काढण्यासाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूरविद्यापीठाने इंडस्ट्री इंटिग्रेटेड बी.कॉम पदवी अभ्यासक्रम नव्याने सुरू केला आहे. उद्योग क्षेत्राच्या मदतीने विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रम अंतर्गत 'कार्पोरेट प्रशासन' शिकविले जाणार आहे. याबाबत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ आणि एमआयडीसी इंडस्ट्रीज असोसिएशन हिंगणा यांच्या दरम्यान बुधवारी सामंजस्य करार करण्यात आला. जमनालाल बजाज प्रशासकीय भवनातील सभाकक्षात आयोजित सामंजस्य करार हस्तांतरण कार्यक्रमाला प्रभारी कुलगुरू डॉ. माधवी खोडे चवरे, प्र-कुलगुरु डॉ. सुभाष कोंडावार, कुलसचिव डॉ. राजू हिवसे, तर एमआयए कडून अध्यक्ष पी. मोहन, सचिव अरुण लांजेवार प्रामुख्याने उपस्थित होते.
हा अभ्यासक्रम स्वयं अर्थसहाय्यीत स्वरूपाचा असून प्रवेश शुल्काच्या २० टक्के रक्कम विद्यापीठाच्या प्रशासकीय खर्चासाठी राखीव ठेवण्यात येईल. प्रशिक्षक मानधन आणि सहाय्यक कर्मचारी यांचे व्यवस्थापन यूजीसीच्या मार्गदर्शक तत्वांनुसार केले जाणार आहे. या उपक्रमाचे परीक्षण नागपूर विद्यापीठ आणि एमआयडीसी इंडस्ट्रीज असोसिएशनच्या वरिष्ठ सदस्यांच्या अध्यक्षतेखालील मॉनिटरिंग कमिटीद्वारे केले जाईल. समिती दर सहा महिन्यांनी बैठक घेऊन विद्यार्थ्यांचा प्रगती आढावा, आर्थिक व्यवहार व एकूण प्रभाव यांचा आढावा घेईल. प्रत्येक सत्रामध्ये १ ते २ महिन्यांचे औद्योगिक प्रशिक्षण अनिवार्य देण्यात येणार आहे.
कराराप्रसंगी डॉ. मेधा कानिटकर, डॉ. विजय खंडाळ, डॉ. अनंत देशमुख, डॉ. राहुल खराबे, डॉ. भूषण महाजन, अजय अग्रवाल, सचिन जैन, अरविंद कलिया, राकेश गुप्ता प्रामुख्याने उपस्थित होते.
कराराचे मुख्य उद्दिष्ट
४० विद्यार्थ्यांच्या पहिल्या बॅचसह बी.कॉम (कॉर्पोरेट अॅडमिनिस्ट्रेशन) अभ्यासक्रमाचा प्रायोगिक आरंभ- युजीसी आणि एनएसडीसी च्या मार्गदर्शक तत्वांनुसार अप्रेंटिसशिप एम्बेडेड शिक्षण प्रणाली
राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० नुसार बहुपातळी पदवी प्रणाली – १ वर्षात सर्टिफिकेट, २ वर्षात डिप्लोमा, आणि ३ वर्षात पदवी
उद्योगाशी संबंधित अभ्यासक्रमाची संयुक्त रचना आणि अंतिम वर्षात सशुल्क अप्रेंटिसशिपची संधी
संस्थात्मक जबाबदारी
नागपूर विद्यापीठ शैक्षणिक पायाभूत सुविधा, प्राध्यापकांचे समन्वयन, विद्यार्थी नोंदणी व्यवस्थापन आणि प्रमाणपत्रे देण्याचे कार्य करेल. तर एमआयडीसी असोसिएशन प्रत्यक्ष प्रशिक्षण, औद्योगिक प्रशिक्षकांची नियुक्ती, औद्योगिक युनिट्समध्ये प्रात्यक्षिक सत्रांचे आयोजन आणि विद्यार्थ्यांच्या रोजगारासाठी सहकार्य करेल.