पोलीस सतर्क : युवक काँग्रेसचे कार्यकर्ते ताब्यात नागपूर : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी विमानतळावर भाजप कार्यकर्त्यांकडून जंगी स्वागत स्वीकारल्यानंतर त्यांचा ताफा दीक्षाभूमीसाठी रवाना झाला. वर्धा रोडवर राजीवनगर चौकात मंदिराजवळ ताफा आला असता युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी काळे झेंडे दाखविण्याचा प्रयत्न केला. मात्र, आधीच साध्या वेशात दबा धरून बसलेल्या पोलिसांनी त्यांना वेळीच ताब्यात घेतले व झेंड्यांसह बॅनर जप्त केले. यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला. युवक काँग्रेसचे शहर अध्यक्ष बंटी शेळके यांच्या नेतृत्वात चक्रधर भोयर, नीलेश चंद्रिकापुरे, रेनॉल्ड जेराम, अंदाज वाघमारे, अमित पाठक, राकेश निकोसे, स्वप्नील ढोके, विशाल साखरे, नीलेश पाटील, मोहम्मद उमर, चेतन थूल, स्वप्नील ढोके आदी कार्यकर्ते राजीवनगर चौकात जमले. त्यांनी सोबत आणलेले काळे झेंडे व शहाविरोधी घोषणा लिहिलेले बॅनर सोबत लपवून ठेवले होते. दुपारी १२ च्या सुमारास शहा यांचा ताफा समोरून येताना दिसताच कार्यकर्त्यांनी झेंडे बाहेर काढले. मात्र, युवक काँग्रेसच्या हालचाली लक्षात येताच दबा धरून बसलेल्या ३० ते ४० पोलिसांनी त्यांना लगेच ताब्यात घेतले. सर्व झेंडे जप्त केले. काहींना पोलीस व्हॅनमध्ये बसवून मागच्या गल्लीत नेऊन सोडले. युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांना विरोध केल्यामुळे काही वेळ तणाव निर्माण झाला होता. यानंतर शहा यांनी दीक्षाभूमीवर गेले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. त्यांच्या पाठोपाठ काँग्रेस कार्यकर्ते पोहचले. गोध्रा प्रकरणात आरोपी असलेल्या शहा यांनी दीक्षाभूमीवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केल्याने पुतळ्याची विटंबना झाल्याचा मुद्दा उपस्थित करून पुतळ्याचे शुद्धीकरण करण्याचा कार्यकर्त्यांचा मानस होता. परंतु पोलिसांना त्यांना रोखले. अखेर पुतळ्याला अभिवादन करून परतावे लागले. विमानतळावर जंगी स्वागतभारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या प्रथम नगरामनानिमित्त शुक्रवारी भाजपच्या कार्यकर्त्यांनी त्यांचे विमानतळावर जंगी स्वागत केले. पक्षाचे नेते, विविध शाखांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विशेषत: महिलांचा सहभाग लक्षणीय होता. दुपारी १२ वाजता इंडिगो विमानाने शहा यांचे आगमन झाले. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस, पक्षाचे शहर अध्यक्ष आमदार कृष्णा खोपडे यांनी त्यांचे स्वागत केले. त्यानंतर तेथे जमलेल्या शेकडो कार्यकर्त्यांच्या दिशेने शहा वळले. त्यांना भेटण्यासाठी कार्यकर्त्यांनी सुरक्षा कठड्याजवळ एकच गर्दी केली. प्रत्येक जण स्वत: मोबाईलमध्ये शहा छायाचित्र टिपण्यासाठी धडपडत होता. मात्र गर्दी वाढल्याने मोजक्याच कार्यकर्त्यांकडून शहा यांना स्वागत स्वीकारता आले. त्यानंतर दीक्षाभूमीकडे रवाना झाले. त्यामुळे अनेकांनी स्वागतासाठी आणलेले हार आणि पुष्पगुच्छ तसेच राहिले. कार्यकर्त्यांचा ताफा दीक्षाभूमीकडे रवाना झाला. दीक्षाभूमीला भेट दिल्यानंतर शाह यांनी फडणवीस यांच्या घरी मोजक्या पदाधिकाऱ्यांसह भोजन घेतले. या संपूर्ण दौऱ्यात शहा यांच्यासोबत भाजपचे प्रदेशाध्यक्ष आ. देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते विनोद तावडे, खा. अजय संचेती, मा खा. बनवारीलाल पुरोहीत, शहर अध्यक्ष आ. कृष्णा खोपडे, आ. सुधाकरराव देशमुख, आ. चंद्रशेखर बावनकुळे, महापौर आ. अनिल सोले, आ. पंकजा मुंडे, आ. विकास कुंभारे, उपेंद्र कोठेकर, संदीप जोशी, प्रवीण दटके उपस्थित होते. (प्रतिनिधी)दीक्षाभूमीला भेटशहा यांनी दीक्षाभूमीला भेट दिली. तेथे त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्धकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर मध्यवर्ती स्मारकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पवित्र अस्थिकलशाचे दर्शन घेऊन आदरांजली अर्पण केली. तथागत गौतम बुद्धांच्या पुतळ्याला अभिवादन केले. या वेळी डॉ. सुधीर फुलझेले, विलास गजघाटे, कैलास वारके, संदीप गवई, अनुसूचित जाती मोर्चाचे अध्यक्ष धर्मपाल मेश्राम, संघपाल उपरे आदी उपस्थित होते.
शहांना काळे झेंडे दाखविण्याचा प्रयत्न
By admin | Updated: July 19, 2014 02:25 IST