ट्रकने चार हरणांना चिरडले,एक अत्यवस्थ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2018 11:00 PM2018-06-29T23:00:38+5:302018-06-29T23:03:23+5:30

हरणांचा कळप रोड पार करीत असतानाच भरधाव वेगात असलेला अवैध रेतीवाहतुकीचा ट्रक कळपात शिरला. त्यात चार हरणांचा चिरडून मृत्यू झाला तर एक हरीण गंभीर जखमी झाले. ही घटना देवलापार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हिवराबाजार-सालई मार्गावर शुक्रवारी सकाळी ६ वाजताच्या सुमारास घडली.

The truck crushed four deer, one extreme | ट्रकने चार हरणांना चिरडले,एक अत्यवस्थ

ट्रकने चार हरणांना चिरडले,एक अत्यवस्थ

googlenewsNext
ठळक मुद्देनागपूर जिल्ह्यातील हिवराबाजार - सालई मार्गावरील घटना

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : हरणांचा कळप रोड पार करीत असतानाच भरधाव वेगात असलेला अवैध रेतीवाहतुकीचा ट्रक कळपात शिरला. त्यात चार हरणांचा चिरडून मृत्यू झाला तर एक हरीण गंभीर जखमी झाले. ही घटना देवलापार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हिवराबाजार-सालई मार्गावर शुक्रवारी सकाळी ६ वाजताच्या सुमारास घडली.
हिवराबाजार-सालई परिसर वन विभागाच्या पवनी वनपरिक्षेत्रांतर्गत येतो. या जंगलात वाघ, बिबट्यांसह इतर वन्यप्राण्यांचा वावर आहे. याच भागातून पवनी - हिवराबाजार - सालई - तुमसर (भंडारा) मार्ग गेला आहे. हल्ली या मार्गावर अवैध रेतीची वाहतूक वाढली आहे. दरम्यान, सकाळी या मार्गावरील वन विभागाच्या आगाराजवळ हरणाचा कळप रोड ओलांडत असताना रेतीची अवैध वाहतूक करणारा एक भरधाव ट्रक त्या कळपात शिरला. ट्रकचालकाने कुठलीही दयामाया न दाखविता चार हरणांना चिरडले आणि वेगात ट्रक घेऊन निघून गेला. त्यात एक हरीण गंभीर जखमी झाले.
माहिती मिळताच वन कर्मचाऱ्यांनी घटनास्थळ गाठून जखमी हरणाला उपचारासाठी पाठविण्याची व्यवस्था केली. शिवाय, मृत हरणांना ताब्यात घेतले. वन्यप्राण्यांचा शिकारीत अथवा अपघातात मृत्यू ही बाब गंभीर आहे. मात्र, या अपघाताबाबत वन अधिकारी फारसे गंभीर असल्याचे दिसून आले नाही. हा अपघात वन विभागाच्या आगाराजवळ झाल्याने या मार्गावरून नेमके कोणते ट्रक रेती घेऊन जातात, याची माहिती वन कर्मचाऱ्यांना असायला हवी. त्या माहितीच्या आधारे आरोपी ट्रकचालकापर्यंत पाहोचणे वन अधिकाऱ्यांना सहज शक्य होईल, असेही जाणकारांनी सांगितले. परिणामी, वन अधिकारी याबाबत काय कारवाई करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

अवैध रेतीवाहतुकीचे वन्यप्राणीही बळी
सध्या जिल्ह्यात रेतीची अवैध वाहतूक प्रचंड वाढली आहे. या अवैध वाहतुकीमुळे सावनेर तालुक्यातील बडेगाव परिसरात झालेल्या अपघातांमध्ये चौघांना त्यांचा जीव गमवावा लागला. आता ही रेतीची अवैध वाहतूक वन्य प्राण्यांच्या जीवावर उठली आहे. वन्य प्राण्यांचे शिकार प्रकरण वन अधिकारी गांभीर्याने घेते. आता वन अधिकारी अपघातही गांभीर्याने घेतात की नाही याबाबत उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.

Web Title: The truck crushed four deer, one extreme

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.