त्रिमूर्तींचे हातात हात, मुत्तेमवार-ठाकरेंवर मात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 1, 2017 01:48 AM2017-09-01T01:48:39+5:302017-09-01T01:49:00+5:30

गेल्या काही वर्षांपासून काँग्रेसमध्ये गटबाजीच्या राजकारणातून वर्चस्वाची लढाई सुरू आहे.

 Triumauri hands in hand, beat Muttemwar and Thackeray | त्रिमूर्तींचे हातात हात, मुत्तेमवार-ठाकरेंवर मात

त्रिमूर्तींचे हातात हात, मुत्तेमवार-ठाकरेंवर मात

Next
ठळक मुद्देचतुर्वेदी, राऊत, अहमद यांची ताकद वाढली : ठाकरेंची मनपातील एन्ट्री अडचणीत

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : गेल्या काही वर्षांपासून काँग्रेसमध्ये गटबाजीच्या राजकारणातून वर्चस्वाची लढाई सुरू आहे. या लढाईत विरोधी पक्षनेतेपदाच्या मुद्यावर माजी मंत्री सतीश चतुर्वेदी, नितीन राऊत व अनिस अहमद या त्रिमूर्तींनी एकत्र येत माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार व शहर अध्यक्ष विकास ठाकरे यांना जोरदार मात दिली आहे. उच्च न्यायालयाने तानाजी वनवे यांची गटनेतेपदी नियुक्ती योग्य ठरविली आणि काँग्रेसच्या राजकारणात त्रिमूर्तींचा गट अधिक भक्कम झाला. वनवेंचा विजय हा चतुर्वेदी-राऊत-अहमद यांचे वजन वाढविणारा तर मुत्तेमवार- ठाकरे यांची ंिचंता वाढविणारा आहे.
चतुर्वेदी-राऊत-अहमद यांना एका दगडात दोन पक्षी मारण्यात यश आले आहे. तानाजी वनवे यांना गटनेतेपदी कायम करून मुत्तेमवारांना राजकीय मात देण्यात त्यांना यश आलेच पण सोबतच विकास ठाकरे यांची महापालिकेतील एन्ट्री रोखण्याचा गेम प्लानही खरा होताना दिसत आहे. वनवे विरोधी पक्ष नेते म्हणून काम पाहतील व ठाकरे महापालिकेत नसतील, अशा परिस्थितीत विरोधी पक्षाची संपूर्ण सूत्रे या त्रिमूर्तींच्या हाती राहणार आहेत. प्रदेश काँग्रेसने पाठविलेल्या निरीक्षकांनी महाकाळकर यांची गटनेतेपदी नियुक्ती केली होती. मात्र, निरीक्षक परतताच या नेत्यांनी राजकीय खेळी खेळली. आपल्यासोबत २९ पैकी १८ नगरसेवक आहेत, असा दावा विकास ठाकरे करीत असताना वनवे यांच्या बाजूने तब्बल १६ नगरसेवक उभे करण्यात या नेत्यांना यश आले. आता वनवे यांच्या नियुक्तीवर न्यायालयाने शिक्कामोर्तब केल्यामुळे आणखी काही नगरसेवक मुत्तेमवार- ठाकरे यांची साथ सोडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
महापालिका निवडणुकीच्या तिकीट वाटपात मुत्तेमवार- ठाकरे यांचा दबदबा होता. विरोधी गटाला तिकिटाच मिळाल्या नाहीत. याचा वचपा काढण्यात चतुर्वेदी- राऊत यांना यश आले आहे.
वनवे विरुद्ध महाकाळकर अशा लढाईत प्रदेश काँग्रेस भक्कमपणे महाकाळकर यांच्या पाठिशी राहिली. प्रदेश काँग्रेसने या खटल्यात अभिजित वंजारी यांची प्रतिनिधी म्हणून नियुक्ती करीत महाकाळकर हेच पक्षाचे गटनेते असल्याची बाजू मांडली. शेवटी वनवे यांच्या विजयामुळे प्रदेश काँग्रेसचाही मोठा पराभव झाला आहे.
ठाकरेंऐवजी जिचकार यांना स्वीकृती
विरोधी पक्षनेत्याचा वाद न्यायालयात सुरू असल्यामुळे महापालिकेत काँग्रेसच्या स्वीकृत सदस्याची नियुक्ती रखडली होती. काँग्रेसकडून स्वीकृत सदस्याच्या एका जागेसाठी शहर अध्यक्ष विकास ठाकरे व माजी नगरसेवक किशोर जिचकार यांनी अर्ज दाखल केले होते. ठाकरे यांच्या अर्जावर विरोधी पक्षनेते म्हणून संजय महाकाळकर यांची स्वाक्षरी आहे तर जिचकार यांच्या अर्जावर विरोधी पक्षनेते म्हणून तानाजी वनवे यांनी स्वाक्षरी केली होती. पुढे गटनेत्याचा वाद न्यायालयात गेल्यामुळे स्वीकृत सदस्याचा निर्णय न्यायालयाच्या निर्णयानंतरच घेतला जाईल, अशी भूमिका महापालिका प्रशासनाने घेतली होती. आता वनवे यांच्या बाजूने निकाल लागल्यामुळे किशोर जिचकार यांची स्वीकृत सदस्य म्हणून नियुक्ती होण्याची शक्यता आहे. महापालिकेच्या आगामी सभेत जिचकार यांच्या नियुक्तीचा प्रस्ताव येण्याचे संकेत सत्तापक्षाने दिले आहेत तर, असा प्रस्ताव आल्यास त्याला उच्च न्यायालयात आव्हान देण्याची तयारी विकास ठाकरे यांनी चालविली आहे.
प्रदेश काँग्रेसच्या भूमिकेकडे लक्ष
वनवे यांना समर्थन देणाºया १६ नगरसेवकांना प्रदेश काँग्रेसच्या आदेशानुसार शहर अध्यक्ष विकास ठाकरे यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली होती. मात्र, त्या नोटिसीला एकाही नगरसेवकाने मुदतीत उत्तर दिले नाही. आम्ही सर्व एकत्र आहोत, असा संदेश यातून नगरसेवकांनी दिला होता. मात्र, मुदत संपून तब्बल चार आठवडे झाल्यानंतरही प्रदेश काँग्रेसने कुठलीही कारवाई केली नाही. आता न्यायालयाचा निर्णय प्रदेश काँग्रेसच्या विरोधात गेला आहे. त्यामुळे आता प्रदेश काँग्रेस नगरसेवकांना बजावलेली नोटीस परत घेण्याचे आदेश देते की कारवाईसाठी पावले उचलते याकडे लक्ष लागले आहे.
वनवेंच्या कार्यालयात जल्लोष
वनवे यांच्या बाजूने निर्णय येताच गुरुवारी विरोधी पक्षनेत्यांच्या कार्यालयात जल्लोष साजरा करण्यात आला. वनवे समर्थकांनी पेढे वाटून आनंद व्यक्त केला. माजी खासदार गेव्ह आवारी, माजी मंत्री अनिस अहमद, माजी आमदार अशोक धवड, यशवंत कुंभलकर यांच्यासह समर्थक महापालिकेत पोहचले. वनवे यांची भेट घेऊन सदिच्छा दिल्या. यावेळी झुल्फेकार अहमद भुट्टो, नेहा निकोसे, कमलेश चौधरी, किशोर जिचकार, दिनेश यादव, बाबा वकील, अनिल मच्छले यांच्यासह नगरसेवक व कार्यकर्ते उपस्थित होते.
न्यायालयाच्या निर्णयामुळे लोकशाही मजबूत होईल
काँग्रेसच्या नगरसेवकांनी बहुमताने निर्णय घेतला होता. विभागीय आयुक्तांनीही बहुमताच्या आधारावर काँग्रेसच्या गटनेतेपदी आपली निवड योग्य ठरविली होती. उच्च न्यायालयानेही या निर्णयावर शिक्कामोर्तब केले आहे. या निर्णयामुळे लोकशाही अधिक मजबूत होईल. महापालिकेतील काँग्रेसच्या सर्व नगरसेवकांना सोबत घेऊ न पक्ष अधिक बळकट करू. तसेच विरोधी पक्षनेता म्हणून पक्षाच्या सर्व नगरसेवकांना सोबत घेऊ न शहरातील नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करू.
- तानाजी वनवे, विरोधी पक्षनेते, महापालिका
सर्वोच्च न्यायालयात जाणार
गटनेत्याची निवड पक्षाकडून केली जाते. त्यानुसार प्रदेश काँग्रेसने पक्षाच्या नगरसेवकांची मते जाणून गटनेता निवडला होता. परंतु काही नगरसेवकांनी पक्षाच्या निर्णयाविरोधात बंड केले. विभागीय आयुक्तांनीही काँग्रेस पक्षाच्या भूमिकेचा विचार न करता निर्णय दिला. या विरोधात न्यायालयात याचिका दाखल केली होती. परंतु न्यायालयाने आमच्या विरोधात निर्णय दिला. या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले जाईल.
- संजय महाकाळकर,
माजी विरोधी पक्षनेते महापालिका
निर्णय पक्षाला मान्य नाही
गटनेतेपदाची लढाई ही संजय महाकाळकर व तानाजी वनवे यांची नव्हती. काँग्रेस पक्ष व पक्षाविरोधात बंड करणारे नगरसेवक यांच्यातील होती. नगरसेवक पक्षाच्या चिन्हावर निवडून आले आहेत. त्यामुळे नगरसेवकांनी पक्षाच्या सल्ल्यानुसार निर्णय घेणे अपेक्षित आहे. परंतु त्यांनी स्वत: च्या मर्जीनुसार गटनेता बदलविण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे पक्षाने न्यायालयात त्यांच्या विरोधात भूमिका मांडली. गटनेता ठरविण्याचा अधिकार पक्षाला आहे. पक्षांतर्गत वाद पक्षश्रेष्ठीकडे मांडून सोडवायला पाहिजे होता. न्यायालयाचा निर्णय पक्षाला मान्य नाही. या संदर्भात प्रदेश काँग्रेस अध्यक्षांसोबत चर्चा करून या निर्णयाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा निर्णय घेऊ .
- विकास ठाकरे,
अध्यक्ष, नागपूर शहर काँग्रेस कमिटी
संदीप जोशींकडून वनवेंना शुभेच्छा
न्यायालयाने वनवे यांच्या बाजूने निर्णय दिल्याची माहिती कळताच महापालिकेतील पत्रकार कक्षात सत्तापक्षनेते संदीप जोशी यांनी तानाजी वनवे याची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. त्यांनी वनवे यांच्याकडून न्यायालयाच्या निर्णयाची माहिती जाणून घेतली.

Web Title:  Triumauri hands in hand, beat Muttemwar and Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.