मित्राची दुचाकी गहाण ठेवून उज्जैनची सहल, परत मागितल्यावर दिली धमकी
By योगेश पांडे | Updated: May 9, 2024 14:58 IST2024-05-09T14:57:47+5:302024-05-09T14:58:21+5:30
Nagpur : वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली घटना

Trip to Ujjain by pledging a friend's bike, threatened when asked to return it
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मित्राची दुचाकी त्याला न विचारता गहाण ठेवत चार आरोपींनी उज्जैनची सहल केली. ज्यावेळी मित्राने दुचाकी परत मागितली तेव्हा त्याला शिवीगाळ करत धमकी देण्यात आली. वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.
मृणाल उर्फ मोंटू दत्तुजी बुराळे (२९, वाठोडा) असे तक्रारदाराचे नाव आहे. तर त्याचेच मित्र शुभम शामकुवर (२६, गोपाळकृष्ण लॉनजवळ), कुणाल उर्फ गोलू शामकुवर (३०, हिवरी ले आऊट), सचिन ढबाले अशी आरोपींची नाव आहेत. काही दिवसांअगोदर हे सर्व लोक उज्जैनला गेले होते. त्यावेळी शुभम व गोलूने मोंटूला त्याची दुचाकी मागितली होती. ती दुचाकी त्यांनी परस्पर गहाण ठेवली व त्या पैशांतून उज्जैनची सहल केली. परत आल्यावर गोलूला ७ मे रोजी मोंटूने दुचाकी परत मागितली. तेव्हा मोंटूने ती दुचाकी गहाण ठेवली असून मी ती काही सोडवत नाही. तुला जे करायचे आहे ते करून घे असे म्हटले. यावरून दोघांमध्ये वाद झाला. गोलू व शुभमने मोंटूला मारण्याची धमकी दिली. त्यानंतर गोलूने दुचाकीने मोंटूच्या घराखाली येत परत धमकी दिली. हे पाहून मोंटूने त्याच्या दिशेने धाव घेतली. गोलू दुचाकी सोडून पळून गेला. त्यानंतर आरोपी कारने आले, मात्र मोंटू बाहेर होता. एकूण प्रकार पाहता मोंटूने वाठोडा पोलीस ठाणे गाठून आरोपींची तक्रार केली. पोलिसांनी तीनही आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे.