Trees in Bharatvan of Nagpur will continue: Information in High Court | नागपूरच्या  भरतवनातील झाडे कायम राहणार  :  हायकोर्टात माहिती

नागपूरच्या  भरतवनातील झाडे कायम राहणार  :  हायकोर्टात माहिती

ठळक मुद्देजनहित याचिका निकाली

लोकमत  न्यूज  नेटवर्क
नागपूर : भरतनगर ते महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयापर्यंत १८ मीटर रुंदीचा ७२० मीटर लांब रोड बांधण्याचा निर्णय रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे भरतवनमधील शेकडो हिरवीगार झाडे कायम राहणार आहेत. मुंबई उच्च न्यायालयाच्यानागपूर खंडपीठाने बुधवारी ही बाब लक्षात घेता, संबंधित जनहित याचिका उद्देश पूर्ण झाल्यामुळे निकाली काढली.
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या जमिनीवरील घनदाट झाडांचा परिसर भरतवन म्हणून ओळखला जातो. संबंधित वादग्रस्त रोड या भरतवनमधून जाणार होता. त्यासाठी ५०-६० वर्षे जुनी मोठमोठी झाडे कापावी लागणार होती. त्याकरिता महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशनने महानगरपालिकेकडे परवानगी मागितली होती. त्यानंतर पर्यावरणप्रेमींनी भरतवनमधील झाडे कापण्याला प्रचंड विरोध केला. त्यासाठी अनेक दिवस आंदोलने केली. न्यायालयाने त्याची गंभीर दखल घेऊन ही जनहित याचिका दाखल करून घेतली होती. दरम्यान, महामेट्रोने वादग्रस्त रोडची योजना रद्द केली. त्याची माहिती बुधवारी न्यायालयाला देण्यात आली.
सुरुवातीला फुटाळा तलाव परिसरात विव्हिंग गॅलरी व भूमिगत रस्त्याचे काम प्रस्तावित होते. त्यामुळे वाहतुकीसाठी भरतवनातून वादग्रस्त रोड बांधण्यात येणार होता. परंतु, भूमिगत रस्ता रद्द करण्यात आल्याने भरतवनातून रोड बांधण्याची गरज संपली. करिता, तो रोड रद्द करण्यात आला. या प्रकरणात अ‍ॅड. कार्तिक शुकुल न्यायालय मित्र होते. मेट्रोतर्फे वरिष्ठ वकील एस. के. मिश्रा तर, मनपातर्फे अ‍ॅड. जेमिनी कासट यांनी बाजू मांडली.

Web Title: Trees in Bharatvan of Nagpur will continue: Information in High Court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.