नागपुरात जुनाट यंत्राद्वारे कर्करोगाच्या रुग्णांवर उपचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 11:20 IST2021-06-02T10:58:49+5:302021-06-02T11:20:54+5:30
Nagpur News नऊ वर्षांपूर्वी हिवाळी अधिवेशनात ‘कॅन्सर हॉस्पिटल’ची घोषणा झाली. परंतु अद्यापही हे हॉस्पिटल कागदावरच आहे. यातच विभागाकडून बंद यंत्राद्वारे कर्करोगाच्या रुग्णांवर कसाबसा उपचार सुरू असल्याने गरिबांच्या वेदनेवर फुंकर घालणार कोण, हा प्रश्न निर्माण झाला आहे.

नागपुरात जुनाट यंत्राद्वारे कर्करोगाच्या रुग्णांवर उपचार
सुमेध वाघमारे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अद्ययावत तंत्रज्ञान व उपचारपद्धतीमुळे कर्करोग जीवघेणा आजार राहिलेला नाही. पहिल्या टप्प्यातच याचे निदान होऊन उपचार झाल्यास त्याची गंभीरता टाळता येणे शक्य आहे. परंतु मेडिकलमध्ये गरीब व मध्यमवर्गीय रुग्ण उपचारासाठी येत असल्याने की काय, येथे अद्ययावत सोयी देण्यास सरकार फारसे गंभीर नसल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे, नऊ वर्षांपूर्वी हिवाळी अधिवेशनात ‘कॅन्सर हॉस्पिटल’ची घोषणा झाली. परंतु अद्यापही हे हॉस्पिटल कागदावरच आहे. यातच विभागाकडून बंद व जुनाट यंत्रांवर कर्करोगाच्या रुग्णांवर कसाबसा उपचार सुरू असल्याने गरिबांच्या वेदनेवर फुंकर घालणार कोण, हा प्रश्न निर्माण झाला आहे.
नऊ वर्षांपासून कॅन्सर हॉस्पिटल कागदावरच
मेडिकलमध्ये कॅन्सर हॉस्पिटल उभारण्याची घोषणा २०१२च्या हिवाळी अधिवेशनात करण्यात आली. परंतु पुढे काहीच होत नसल्याचे पाहत कर्करोग विभागाचे माजी विभागप्रमुख डॉ. कृष्णा कांबळे यांनी गरीब रुग्णांच्या हितासाठी हॉस्पिटलच्या स्थापनेबाबत जनहित याचिका दाखल केली. जून २०१७ मध्ये न्यायालयाने दोन वर्षांत कॅन्सर हॉस्पिटल उभारावे, असे निर्देश दिले. परंतु तेव्हापासून केवळ कागदांचा खेळ सुरू आहे. हॉस्पिटलच्या बांधकामासाठी ७६ कोटी दहा लाख ५८ हजार रुपयांना प्रशासकीय मंजुरी मिळाली. परंतु खात्यात निधी जमा झाला नाही. दुसरीकडे नागपूर जिल्हाधिकारी कार्यालय हॉस्पिटलच्या प्रस्तावित जागेसाठी मेडिकलला मदत करीत नसल्याचे वास्तव आहे. परिणामी, नऊ वर्षांपासून हे रुग्णालय केवळ कागदावरच आहे.
-१५ वर्षाचे कालबाह्य ‘कोबाल्ट’ आजही रुग्णसेवेत
मेडिकलमधील कर्करोग विभागाच्या विकासासाठी केंद्र सरकारने २००५ मध्ये दोन कोटी ८८ लाख रुपये दिले होते. या निधीतून २००६ मध्ये ‘कोबाल्ट’ यंत्र दाखल झाले. त्यावेळी कर्करोगाच्या रुग्णांसाठी हे यंत्र वरदान ठरले. काळाच्या ओघात हे यंत्र आता मागे पडले. परंतु शासन ‘लीनियर एक्सिलरेटर’ सारखे अद्ययावत यंत्र देत नसल्याने १५ वर्षे जुने ‘कोबाल्ट’वर आजही रुग्णांना रेडिएशन दिले जात आहे. या यंत्रामुळे शरीरातील सामान्य पेशींचे नुकसान होत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
-आठ महिन्यांपासून ‘ब्रॅकी थेरपी’ बंद
मेडिकलच्या कर्करोग विभागाला २००९ मध्ये तीन चॅनलचे ‘ब्रॅकी थेरपी’ यंत्र उपलब्ध झाले. दोन वर्षांपूर्वी या यंत्राच्या कंपनीने हे यंत्र कालबाह्य झाल्याचे सांगितले. तरीही ओढून ताणून यंत्र रुग्णसेवेत सुरू होते. परंतु आता मागील ८ महिन्यांपासून बंद पडले ते कायमचेच. गर्भाशयाचा कॅन्सर, घशाचा कॅन्सर व स्तन कॅन्सरच्या रुग्णांवर रेडिएशन देण्यासाठी हे यंत्र महत्त्वाचे मानले जाते. परंतु बंद पडलेले यंत्र यातच तीनच चॅनलचे असल्याने त्या जागी १७ ते १८ चॅनल असलेल्या नव्या यंत्राची गरज असल्याचे येथील डॉक्टरांचे म्हणणे आहे.