अजनीतील झाडे ताेडणे हा खुळचटपणा; विदेशातील तरुणांनी व्यक्त केला संताप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2020 14:35 IST2020-12-15T14:35:28+5:302020-12-15T14:35:55+5:30
Nagpur News अजनीतील हजाराे झाडे कापणाऱ्या माॅडेल स्टेशनच्या प्रकल्पाला आता सर्वच स्तरातून विराेध हाेत आहे. नागपूरच नाही तर अजनीतील वनसंपदा वाचविण्याच्या माेहिमेला विदेशातूनही पाठबळ मिळत आहे.

अजनीतील झाडे ताेडणे हा खुळचटपणा; विदेशातील तरुणांनी व्यक्त केला संताप
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अजनीतील हजाराे झाडे कापणाऱ्या माॅडेल स्टेशनच्या प्रकल्पाला आता सर्वच स्तरातून विराेध हाेत आहे. नागपूरच नाही तर अजनीतील वनसंपदा वाचविण्याच्या माेहिमेला विदेशातूनही पाठबळ मिळत आहे. नागपूरकर तरुणांनी साेशल मीडियावर प्रचार करताच वेगवेगळ्या देशातील तरुणांनी व्हिडीओ संदेश पाठवत वृक्षताेडीला विराेध केला. साता समुद्रापारच्या जर्मनीत राहणाऱ्या तरुणांनी सेव्ह अजनी म्हणत हजाराे झाडांची कत्तल करणे म्हणजे निव्वळ खुळचटपणा असल्याचे म्हणत संताप व्यक्त केला.जर्मनीतून कॅमेल आणि सफरीना या तरुणांनी व्हिडीओ संदेश पाठविला आहे. कॅमेल म्हणताे, हा मुर्खपणा आहे. येणारा काळ सुखकर ठेवण्यासाठी, पर्यावरण सुरक्षित राहण्यासाठी झाडांचीच सर्वाधिक गरज आहे. अशावेळी अजनीतील शेकडाे वर्ष जुनी हजाराे झाडे कापण्याचा निर्णय घेउन आपल्याच जीवाशी खेळ चालविला आहे. असाच मुर्खपणा ग्लाेबल वार्मिंगसाठी कारणीभत ठरताे. या प्रकल्पाला विराेध करणाऱ्या लाखाे भारतीयांसाेबत आम्ही आहाेत, अशी भावना त्याने व्यक्त केली.
सफरीनाने सुद्धा संताप व्यक्त केला. भविष्य वाचवायचे असेल तर झाडे वाचवेच लागतील. नागपूर शहर प्रदूषित झाल्यानंतर जागे हाेण्यात अर्थ नाही. आताही वेळ गेली नाही. नागपूरकरांनाे जागे व्हा, असे आवाहन करीत सरकारने हा प्रकल्प मागे घ्यावा, अशी विनंतीही केली आहे.
मनपा म्हणाली, सर्वेक्षणाला महिना लागेल
दरम्यान महापालिकेच्या उद्यान विभागाने अजनीतील झाडांच्या माेजदाद करण्यासाठी सर्वेक्षण सुरू केले आहे. एनएचएआयने केवळ १९०० झाडांचा दाखला दिला पण या ठिकाणी ७००० पेक्षा अधिक झाडे आहेत. त्यामुळे सर्वेक्षणाला किमान महिनाभर लागेल, असे स्पष्ट केले आहे.