‘ईयर टॅगिंग’ शिवाय जनावरांची वाहतूक बंद
By आनंद डेकाटे | Updated: May 6, 2024 18:08 IST2024-05-06T18:07:33+5:302024-05-06T18:08:44+5:30
Nagpur : १ जूनपासून अंमलबजावणी

Transport of animals without 'ear tagging' stopped
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जनावरांची बेकायदा होणारी वाहतूक रोखण्यासाठी 'ईयर टॅगिंग' शिवाय इतर राज्यातील जनावरे महाराष्ट्रात येण्यास बंदी घातली आहे. त्यामुळे १ जून पासून 'ईयर टॅगिंग' नसलेली जनावरे बाजार समित्या, आठवडी बाजार आणि गावागावातील खरेदी विक्री करण्यास प्रतिबंध केल्याने बेकायदा कत्तलींना आळा बसेल.
केंद्र सरकारच्या पशुसंवर्धन विभागाने नॅशनल डिजिटल लाईव्ह स्टॉक मिशन अंतर्गत भारत पशुधन प्रणाली कार्यान्वित केली आहे. या प्रणालीत ईयर टॅगिंग' (१२ अंकी बारकोड) च्या नोंदी घेण्यात येत आहे. त्यात जन्म मृत्यू नोंदणी, प्रतिबंधात्मक लसीकरण व औषधोपचार, वंध्यत्व उपचार, मालकी हक्क हस्तांतरण यांचा समावेश आहे. जिल्ह्यातील सर्व पशुवैद्यकीय संस्थांमार्फत जनावरांच्या कानात टॅग (बिल्ला) लावून त्याची भारत पशुधन प्रणालीवर नोंदणी प्रक्रिया सुरू आहे. यामुळे राज्यातील सर्व पशुधनाची सर्वंकष माहिती एका ठिकाणी उपलब्ध होईल.
- ‘ईयर टॅगिंग’ शिवाय मदतही नाही
जिल्ह्यातील सर्व ग्राम पंचायत, नगरपरिषद, पालिका, महानगरपालिका यांना पशुधनाची 'ईयर टॅगिंग' करून त्यांची नोंदणी भारत पशुधन प्रणालीवर करणे बंधनकारक आहे. १ जून २०२४ नंतर 'ईयर टॅगिंग' शिवाय पशुधनास पशुवैद्यकीय संस्था, दवाखान्यांमधून पशुवैद्यकीय सेवा देय होणार नाही. तनेच कत्तलखान्यात टॅग असल्याशिवाय म्हैस वर्गीय जनावरांची कत्तल करण्यास परवानगी मिळणार नाही.